महिना उलट आला तरी दिव्यांग, बीएसयुपीच्या घरांच्या चाव्या हाती नाहीत

BSUP Scheme - Thane Municipal Corporation

ठाणे : सत्ताधारी शिवसेनेच्या माध्यमातून मोठा गाजावाजा करुन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ठाण्यात विविध योजनांचे भुमीपुजन, लोकार्पण करण्यात आले. मात्र क्लस्टरचे भुमीपुजन करण्यात आल्यानंतरही ही योजना प्रत्यक्षात महिना संपत आला तरी सुरु झालेली नाही, तसेच दिव्यांगाना घरांचे, स्टॉलचे वाटप, बीएसयुपीच्या घरांचे वाटपही अद्यापही झालेले नाही. शिवाय आपला दवाखानाचा डेमो आजही घाणोकर नाटयगृहाच्या आवारात असून या योजनेतून तयार होणारे दवाखाने अद्यापही तयार झालेले नाहीत. त्यामुळे करुन दाखवले म्हणत सत्ताधारी शिवसेनेने ठाणोकरांच्या डोळ्यात धुळफेक केली का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

निवडणुकीपूर्वी ठाणोकरांना दिलेला क्लस्टर योजनेचे आश्वासन सत्ताधारी शिवसेनेने पूर्ण केले असले तरी त्याचे काम प्रत्यक्षात सुरु झालेले नाही. 6 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते किसनगर भागातील काही भागाचे भुमीपुजन करण्यात आले होते. त्यानंतर हे काम सुरु होईल अशी आशा होती, परंतु हे महत्वाचे काम अद्यापही सुरु झालेले नाही. विशेष म्हणजे येथील रस्ता रुंदीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असली तरी या योजनेत अद्यापही अडथळे कायम आहेत, याच्या हरकती, सुनावणी अद्यापह झालेल्या नाहीत, योजना राबविण्यासाठी विकासक अद्यापही पुढे येताना दिसत नाही. तसेच येथील बाधीतांचे तात्पुरत्या स्वरुपात पुनर्वसन कुठे करणार याचेही नियोजन अद्याप झालेले नाही.

त्यामुळे हा हट्ट कशासाठी असा सवाल आता उपस्थित झाला आहे. दुसरीकडे दिल्लीतील मोहल्ला क्लिनीकच्या धर्तीवर ठाण्यात आपला दवाखाना सुरु करण्यात आला आहे. याचे पहिले दोन प्रयोग सपशेल फसले आहेत. असे असतांना शहराच्या विविध भागात अशा स्वरुपाचे 5क् दवाखाने सुरु करण्याच्या निमित्ताने त्याचेही लोकार्पण करण्यात आले आहे. परंतु महिना उलट आल्यानंतरही घाणोकर नाटय़गृह परिसरातील दवाखान्याचा डेमो काही हललेला नाही. मात्र शहरात इतर ठिकाणी कुठेही हा दवाखाना सुरु झालेला नाही.

तसेच बीएसयुपीच्या घरांचे वाटप सुध्दा यावेळी करण्यात आले होते. तसेच दिव्यांगांना 190 घरांचे, 260 स्टॉलचे वाटपही प्राथिनिधीक स्वरुपात करण्यात आले होते. प्रकल्पबाधितांना घरांचे वाटप, आदी देखील महिना उलट आला असतानाही हे सर्व कागदावरच राहिल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान दिव्यांगाच्या घरांच्या फाईलवर शुक्रवारी आयुक्तांनी स्वाक्षरी केल्याची माहिती पालिका सुत्रंनी दिली आहे. याशिवाय ढोकाळी भागात सायन्स पार्क आणि अर्बन जंगल या प्रकल्पाचे भुमीपुजनही करण्यात आले होते. परंतु सत्ताधा:यांनीच आता या प्रकल्पाला स्थगिती दिली आहे. ही सर्व कामे अर्धवट असतांना त्याची घाई कशासाठी करण्यात आली असा सवाल आता उपस्थित झाला आहे.

या निमित्ताने घेण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी लाखोंचा निधी खर्ची करण्यात आला आहे. परंतु आता एक ते दोन आठवडय़ात पुन्हा या योजनांसाठी आणखी एक कार्यक्रम घेण्याचा विचार पालिकेचा असून त्यानंतर प्रत्यक्षात घरांच्या चाव्या वाटप, स्टॉल वाटप केले जाणार आहे.