अंकिता रैना ‘लकी लुजर’ असली तरी भारतासाठी आहे ‘विनर’

Ankita Raina

असे म्हणतात, ‘लढणारांनाच नशिबही साथ देते’ ..टेनिसपटू अंकिता रैनाबाबत (Ankita Raina) असेच झालेय. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस (Australian Open Tennis) स्पर्धेच्या महिला एकेरी मेन ड्रॉमध्ये स्थान मिळवण्यासाठी ती लढली. पात्रता स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचली पण अंतिम फेरीत तिला हार पत्करावी लागली पण नशिब म्हणा की आणखी काही, अंकिताचे हे श्रम वाया गेले नाहीत आणि आता तिला लकी लूजर (Lucky loser) म्हणून यंदाची ऑस्ट्रेलियन ओपन खेळायची संधी मिळू शकते.

पात्रता स्पर्धेच्या अंतिम फेरित पोहोचलेल्या 16 खेळाडूंपैकी सहा खेळाडूंची लकी लूजर म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यात अंकिताची वर्णी लागली आहे. सहाव्या प्रयत्नात या 28 वर्षीय खेळाडूला हे यश मिळाले आहे. त्याद्वारे कुणी माघार घेतल्यास अंकिताला महिला एकेरीच्या मेन ड्रॉमध्ये खेळायची संधी मिळू शकते.

ग्रँडस्लॕमच्या मेन ड्रॉसाठी पात्र ठरणे ही व्यावसायिक टेनिसमध्ये विशेष बाब नसली तरी भारतासाठी ही फार मोठी बाब आहे कारण अंकिताच्या आधी केवळ दोनच भारतीय महिला ग्रँडस्लॅमच्या मेन ड्रॉमध्ये खेळल्या आहेत. पहिली म्हणजे निरुपमा वैद्यनाथन आणि दुसरी अर्थातच सानिया मिर्झा. निरुपमा 1998 च्या आॕस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळली होती तर सानिया 2012 मध्ये ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या एकेरित खेळली होती.

कोरोनामुळे ऑस्ट्रेलियन ओपनच्या इतिहासात पहिल्यांदाच पात्रता स्पर्धा दुबईत खेळली गेली. त्यात अंकिता ही अंतिम फेरीत सर्बियाच्या ओल्गा दानिलोव्हीचकडून 2-6, 6-3, 1-6 अशी पराभूत झाली. पण आता लकीलुजर 6 मध्ये स्थान मिळाल्याने ती मेलबोर्न येथे लवकरच जाणार आहे. तेथील क्वारंटाईनची पूर्तता केल्यावर ती कुणी माघार घेतल्यास पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळेल.

पुरुषांमध्ये सुमीत नागलला मेन ड्रॉमध्ये थेट स्थान मिळाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER