दाऊदचा भाऊ अनिस इब्राहीमचे आर्थिक व्यवहार सांभाळणारा अल्ताफ गजाआड

Mohamed Altaf Abdul Latif Saeed

मुंबई :- कुख्यात मोस्ट वॉन्टेड गँगस्टर दाऊद इब्राहीमचा भाऊ अनिस इब्राहीम याचे आर्थिक व्यवहार सांभाळणार्‍या मोहम्मद अल्ताफ अब्दुल लतीफ सईद याला मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. दुबईतून आलेल्या अल्ताफला केरळ राज्यातील कुन्नूर विमानतळावरुन ताब्यात घेत ही कारवाई केली आहे.

गँगस्टर अनिस इब्राहीम हा एका हॉटेल व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकावत होता. हॉटेल व्यावसायिकाने त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याने अनिसचा खास हस्त रामदास रहाणे हा त्याला धमकाऊ लागला. अखेर हॉटेल व्यवसायिकाच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करत गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने याप्रकरणात डी गँगच्या हवाला ऑपरेटरसह चार जणांना बेड्या ठोकल्या. चौघांवरही मोक्का कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन खंडणी विरोधी पथकाने अनिसच्या कारवायांचा माग काढण्यास सुरुवात केली.

नवी मुंबईतील रहिवाशी असलेला अल्ताफ हा सध्या दुबईत वास्तव्यास असून तो अनिस इब्राहीमचे सर्व आर्थिक व्यवहार सांभाळत असल्याची महत्वपूर्ण माहिती खंडणी विरोधी पथकाच्या हाती लागली. अल्ताफच्या हालचालींवर नजर ठेवत खंडणी विरोधी पथकाने सोमवारी दुबईतून केरळ राज्यातील कुन्नूर विमानतळावर उतरताच त्याला ताब्यात घेतले. अल्ताफला मुंबईत आणून कसून चौकशी केल्यानंतर त्याचा गुन्ह्यातील सहभाग उघडकीस येताच गुन्हे शाखेने त्याला बेड्या ठोकल्या. न्यायालयाने अल्ताफला 16 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.