‘तसंच काहीसं ठाकरे सरकारचं झालं !’ कांजूर मार्ग कारशेडच्या मुद्द्यावरून नितेश राणेंचा टोला

Nitesh Rane - Uddhav Thackeray

मुंबई :- कांजूर मार्गमधील मेट्रो कारशेडचे काम तत्काळ थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले असून ठाकरे सरकारला मोठा दणका दिला आहे. याच मुद्द्यावरून भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार टीका केली. भिंतीवर थुंकू नका लिहूनही लोक थुंकतात. तसंच काहीसं ठाकरे सरकारचं झाल्याचा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.

कांजूर मार्ग कारशेड (Kanjurmarg Car Shed) प्रकरणी उच्च न्यायालयाने जैसे थे परिस्थिती ठेवण्याचा आदेश दिल्यानंतर नितेश राणे यांनी ट्विट करून राज्य सरकारवर टीका केली आहे. काही भिंतींवर थुंकना मना है, असं लिहिलेलं असतं. तिथेच लोक जास्त थुंकतात. ठाकरे सरकारचंही तेच झालं आहे, अशी टीका राणे यांनी केली आहे.

दुसरीकडे, भाजपचे नेते आशिष शेलार यांनीही या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर टीका केली आहे. मेट्रो कारशेडच्या कामाला कोर्टाने स्थगिती दिली आहे. आरेबाबत हे सरकार सर्वोच्च न्यायालयाचे आदेशही मान्य करत नाही. त्यांना कांजूर मार्गबाबत संयुक्त समितीने दिलेला अहवालही मान्य नाही. आता उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय तरी मान्य होईल का? असा सवाल करतानाच स्वत:च्या अहंकरासाठी मुंबईकरांचे अजून किती नुकसान करणार? असा सवाल शेलार यांनी केला आहे. तसेच मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर आता बालनाट्य सुरू आहे. बालहट्टामुळेच मुंबईकरांचे नुकसान होत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER