पेंग्विन टी गँगकडून करदात्यांच्या पैशांचाही दुरुपयोग; नितेश राणेंची मुख्यमंत्री,आदित्यवर टीका

Aaditya Thackeray - Nitesh Rane

मुंबई :- राज्य सरकारकडून कोरोनाबाधित रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या वांद्रे कुर्ला संकुलातील (बीकेसी) कोविड -१९ उपचार केंद्राला निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. विशेष म्हणजे या चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता लक्षात घेऊनच मंगळवारी (२ जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथील रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवल्याची माहिती दिली होती. असं असलं तरी आमदार नितेश राणे यांनी बीकेसीतील या केंद्राचे नुकसान झाल्याचे व्हिडीओ पोस्ट करत जोरदार टीका केली आहे.

निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्रात धडकण्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारीच (२ जून) राज्य सरकारच्या तयारीची माहिती जनतेला दिली होती. तसेच आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन केलं होतं. यावेळी त्यांनी बीकेसीमध्ये कोरोना रुग्णांसाठी उभारलेल्या कोविड सेंटरमधील रुग्णांना सुरक्षेची खबरदारी म्हणून इतर ठिकाणी हलवण्यात आल्याचंही सांगितलं होतं. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेऊन राज्य सरकारने बीकेसीमध्ये महत्त्वाकांक्षी कोविड- १९ उपचार केंद्राची उभारणी केली होती. स्वतः मुख्यमंत्र्यांनी अनेकदा त्याचा उल्लेख करून महाराष्ट्राची पूर्ण तयारी असल्याचं म्हटलं होतं. मात्र, कोरोनासोबतच अचानकपणे महाराष्ट्रात धडकलेल्या या चक्रीवादळाच्या संकटाने ही बीकेसीतील तयारी विस्कळीत केली आहे. त्याबाबतचे एक ट्विट करत राणे यांनी व्हिडीओ पण शेअर केला आहे.