
चौथा लॉकडाऊन ३१मे २०२० ला संपतोय. म्हणजे १जूनला आपली स्थिती काय असेल हे येत्या रविवारी स्पष्ट होईल. केंद्र सरकार यापुढे राज्यांमधे काय करावं, हे सांगेलसं वाटत नाही. किंबहुना आता चार लॉकडाऊननंतर देशपातळीवर करोना संसर्ग आणि करोनाचे बळी, या दोन्हींसंदर्भात भारताचं देश म्हणून रेकॉर्ड वा कामगिरी खूपच चांगली आहे, हे जगात कोणीही मान्य करेल…अर्थात पोलिटिकल इन्क्लिनेशन वा बायस म्हणजेच राजकीय भूमिका किंवा पूर्वग्रह नसेल तर…
त्यामुळं आता एक जूनपासून काय करावं, हे त्या त्या राज्यानं स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन अर्थव्यवस्थेला गती द्यावी, ही अपेक्षा आहे. महाराष्ट्रात काही मोजक्या जिल्ह्यातच करोना संसर्ग जास्ती आहे किंवा वाढतो आहे. त्यामुळं अनेक जिल्ह्यात जनजीवन सर्वसामान्य स्थितीत आणण्यासाठी म्हणजेच कोणतीही बंधन असू नयेत, असाच विचार सरकारी पातळीवर सुरू आहे. मात्र, ते करताना लोक एकदम मोठ्या संख्येनं बाहेर पडून आतापर्यंत नियंत्रणात असलेला करोना विषाणू पसरू नये, ही काळजीही आवश्यक ठरणार आहे.
या गोष्टी विचारात घेऊन हिरे निर्यातीचा व्यापार किंवा स्थानिक पातळीवरची दुकानं असोत, व्यापार उदिम किंवा सॉफ्टवेअरसारख्या क्षेत्रातलं काम असो, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अचानक सुरू न करता टप्प्याटप्प्यानं सुरू करणं, ज्या आस्थापना स्वतःचं वाहन कर्मचाऱ्यांना पुरवू शकतात अशी कार्यालयं आधी सुरू करणं, अर्थव्यवस्थेला गती देऊ शकणारे उद्योग, करोना पसरू न देता ज्यांचे व्यवहार वा कार्यलयीन कामकाज होऊ शकते, अशा प्रकारची कार्यालये टप्प्याटप्प्यानं सुरू करावीच लागतील कारण लॉकडाऊन हा कायमस्वरूपी उपाय असूच शकत नाही.
अर्थव्यवस्थेला गती देताना आणि उद्योगांना परवानग्या देताना केंद्र सरकारनं मोठी क्रीडा संकुलं सुरू करा पण लोकांची, प्रेक्षकांची गर्दी होणार नाही याची काळजी घ्या असं सांगितलं आहे. पण राज्यामधे व पुण्यासारख्या शहरातही अर्थव्यवस्थेमधे क्रीडा क्षेत्र विविध पातळ्यांवर छोटा का होइना, पण वाटा उचलत असतं, हे लक्षात घ्यायला हवं. उदाहरणार्थ, टेबल टेनिस किंवा बॅडमिंटनसारखे खेळ ज्यात सोशल डिस्टन्सिंग मुळातच पाळलं जात असल्यानं टेबल टेनिस, टेनिस, बॅडमिंटन कोर्ट्स सुरू करायला हवीत. पुण्यासारख्या शहरात छोट्या मैदानांवर प्रत्येकी सात खेळाडूंमधे खेळला जाणारा फुटबॉलचा खेळ, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल आदी मैदानी खेळ, अथलेटिक्स हेही सुरू होऊ शकतं फक्त त्यामधे कंटेन्मेंट झोनमधले खेळाडू प्रतिबंधित करून या सर्व प्रकारांना परवानग्या देता येतील का, याचा विचार करायला हवा.
ज्येष्ठ नागरिकांना मॉर्निंग वॉकसाठी घराजवळच्या एक दोन किलोमीटरमधे फिरण्याची परवानगी देण्याचाही विचार करायला हवा. एक तर ज्येष्ठ नागरिकांमधे हृदयरोगविषयक उपचार, प्लास्टी, शस्त्रक्रिया, रक्तदाब, मधुमेह असे रोगप्रकार असले तर सकाळच्या चालण्याच्या व्यायमाच्या बरोबरच काही रोज भेटणाऱ्या दिसणाऱ्या लोकांना लांबूनच भेटल्यानंही अनेक ज्येष्ठ नागरिक ताजेतवाने होत असतात, हेही लक्षात घ्यायला हवं. करोना पसरणार नाही, याची पूर्ण काळजी घेऊन फक्त उद्योगच सुरू करायचे असे नाही तर सामान्य जीवनातले कोणते व्यवहार सुरू होऊ शकतात, याचाही विचार चौथा लॉकडाऊन संपताना करायला हवा. तो सरकार करेल, अशी अपेक्षा बाळगू यात…
शैलेन्द्र परांजपे
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला