शुल्क न आकारता व्यवसायास परवानगी द्या – पालकमंत्री

भंडारा :- लॉकडाऊनच्या काळात लोकांचे व्यवसाय बंद झालेले आहेत. परिणामी रोजगाराच्या साधनाअभावी नागरिकांना आर्थिक चणचण भासू लागली. दुकानदारसुद्धा कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या परिस्थितीत जीव धोक्यात घालून स्वयंस्फूर्तीने सर्वसामान्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करीत आहेत. अशा परिस्थिती जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसाठी तसेच व्यवसायासाठी प्रशासनाने कोणतेही शुल्क आकारु नये, असे निर्देश पालकमंत्री सुनिल केदार यांनी दिली. लॉक डाऊनच्या काळात छोट्या व्यवसायिकांचे योगदान महत्त्वाचे असून शेतकऱ्यांच्या भाजीपाला विक्रीवर सुद्धा शुल्क आकारता कामा नये. उलट शेतकरी व गरिबांना मदतीचा हात द्या, असेही त्यांनी सांगितले. पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील तुमसर, मोहाडी व भंडारा तालुकास्तरीय आढावा बैठक आयोजित करण्यात आल्या होत्या, त्यावेळी ते बोलत होते.

आमदार राजू कारेमोरे, माजी खासदार मधुकर कुकडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, माजी मंत्री नाना पंचबुध्दे,उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, नितीन सदगीर, उपवन संरक्षक विवेक होशिंग, उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू , श्री. पिपरेकर, तहसिलदार गजेंद्र बालपांडे, धंनजय देशमुख, अक्षय पोयाम, नगर परिषद मुख्याधिकारी अर्चना मेंढे, ज्ञानेश्वर ढेरे, खंडविकास अधिकारी, तसेच तालुका आरोग्य अधिकारी, विभाग प्रमुख व पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते.

ही बातमी पण वाचा :  चिकन आणि अंडी दर वधारला

भंडारा येथील निवारागृहात असलेल्या विस्थापित कामगारांना प्रशासनाने झाडू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. त्यांनी तयार केलेले झाडू बाजारात विक्री करण्यास सहकार्य केल्यामुळे त्यांना आर्थिक लाभ होत असल्याचे भंडारा तहसिलदार यांनी सांगितले. अशा प्रकारचा राज्यातील हा अभिनव उपक्रम असल्याचे सांगून या स्तुत्य उपक्रमाचे पालकमंत्र्यांनी कौतुक केले

अन्नधान्याच्या आढावा घेताना पालकमंत्र्यांनी म्हणाले की, नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अन्न धान्याचा तुटवडा होणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी. आवश्यकता भासल्यास वाढीव अन्नधान्याच्या मागणीचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात यावा. त्यामध्ये साखर, तूरडाळ, चनाडाळ यांचाही समावेश करा. प्रस्तवावर तात्काळ कार्यवाही करुन अन्न धान्य उपलब्ध करुन देण्यात येईल असे ते म्हणाले. सध्याची परिस्थिती बिकट असून जिल्ह्यातील कोणताही व्यक्ती उपाशी राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. साखर खरेदी प्रस्तावित असून त्यामुळे कमी किमतीत व वाहतुकीचा प्रश्न उपस्थित न होता नागरिकांना साखर तात्काळ उपलबध होणार आहे, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील प्रत्येक गरीब माणसापर्यंत धान्य पोहचले पाहिजे असे निर्देश त्यांनी दिले.

ज्या कुटूंबाकडे रेशनकार्ड नाही, किंवा कार्ड अपडेट नाही अथवा ज्यांना रेशन कार्ड देता येत नाही अशा कुटुंबाची यादी तहसिलदार, खंडविकास अधिकारी व मुख्याधिकारी यांनी समन्वयायने तात्काळ तयार करावी. यावर उपविभागीय अधिकारी हे देखरेख करतील, अशा सूचना त्यांनी दिल्या. या कामासाठी तलाठी, ग्रामसेवक, आशा वर्कर, पोलीस पाटील, केंद्र प्रमुख याद्वारे शहरात व गावागावात सर्वे करा. यामध्ये तफावत आढळून येऊ नये. विधवा तसेच दिव्यांगांचा यादीत प्राधान्याने समावेश करावा कारण या घटकांना अन्नधान्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावतो असे ते म्हणाले. आता सर्वच कुटुंब शासनाच्या रेशनसाठी पात्र आहेत. त्यांना रेशन कार्ड द्या. तसेच पोर्टेबिलीटी मुळे राज्यातील प्रत्येक व्यक्तीस अन्नधान्य मिळणार आहे, नागरिकांनी काळजी करु नये असा विश्वास त्यांनी दिला. नागरिकांना विनाकारण त्रास होणार नाही याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, असे ते म्हणाले. जिल्ह्यात कुठल्याही कारणास्तव नळ कनेक्शन कापू नये. भाजी मार्केट मध्ये भाजी विक्रेत्यांना मोकळ्या जागेवर परवानगी देताना सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे.

लॉकडाऊनच्या काळात प्रशासनाने लोकांचे जास्तीत जास्त सहकार्य मिळविणे अपेक्षित आहे. बाहेरुन अपडाऊन करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचेवर कडक नजर ठेवा. कृषी व्यवसाय व त्याअंतर्गत व्यवसायांना पासेस द्या. तरच आपली अर्थव्यवस्थेची घडी नीट करणे सोयीचे होईल, असे त्यांनी सांगितले. तेंदुपत्ता वेचणाऱ्या लोकांना नियमित फंड उपलब्ध करुन द्यावा, त्यामध्ये हयगय चालणार नाही. मनरेगा निधीचे योग्य नियोजन करुन मजूरांना काम देण्याच्या, अशा सूचना त्यांनी दिल्या.

जिल्हा ग्रीन झोन मध्ये असल्याने आपण भाग्यवान आहात. जिल्ह्यातील अन्य व्यवसाय जसे मोबाईल रिचार्ज, झेरॉक्स व इतर उपयोगी व्यवसाय टप्प्याटप्प्याने सुरु करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. कृषी केंद्र नियमित सुरु ठेवा. शेतकऱ्यांना कोणतीही अडचण भासणार नाही याची दक्षता घ्यावी. बांधकाम व्यवसायाशी संबधित लाकुड कटाई मशीनही चालू ठेवा असे त्यांनी सांगितले.

लॉकडाऊन शासनाचे आदेशानुसार आहे. सध्या नागरिकांना काम नाही. नागरिक आर्थिक दृष्टया कमकुवत झालेला आहे. अशा परिस्थितीत कोणतेही शुल्क आकारु नये, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. अशा बिकट परिस्थितीत प्रशासन, नागरिक स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधींसह समन्वयाने काम करा व जीवनावश्यक वस्तूंचे किट व अन्नधान्य व्यवस्थित पुरवठा करा असे ते म्हणाले .यावेळी जीवनावश्यक किटची पाहणी पालकमंत्र्यांनी केली. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून मिळालेल्या निधीचा वापर लोकांना जीवनावश्यक वस्तू वाटपासाठी करावा. वरठी येथे शिवभोजन केंद्राचे उदघाटन पालकमंत्री सुनिल केदार यांनी फित कापून केले. यावेळी आमदार राजू कारेमोरे उपस्थित होते.

भंडारा जिल्हा कोरोना मुक्त आहे. परंतु कोरोना बाधित जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांमुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. कोरोना बाधित जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांची तपासणी करताना डॉक्टरांनी स्वत:ची काळजी घेण्यासोबतच प्राथमिक आरोग्य केद्रातील सर्व कर्मचाऱ्यांची काळजी घेण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी दिल्या.


Web Title : Allow business without charge – Guardian Minister

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)