आघाडी सरकारच्या काळातील पाप पुसण्यात युतीची ५ वर्ष गेली : आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray

मुंबई : यापूर्वीच्या आघाडी सरकारने राज्याचा विकास केलाच नाही. उलट राज्याला मागे आणले आणि पापच करीत राहिले. मात्र युती सरकारने अनेक विकास कामे केली असून मुंबई महापालिकेने आरोग्य, शाळा ,वाहतूक आदी विभागांमध्ये भरीव कामगिरी केली आहेत. मुंबईच्या विकासाचे मॉडेल महाराष्ट्रात न्यायचे असे मत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.

ते कुर्ला विधानसभेतील महायुतीचे उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष दिगंबर नाईक, भाजपचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक सुषम सावंत, उमेदवार मंगेश कुडाळकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मी सध्या महाराष्ट्रभर फिरत आहे. ११८ मतदारसंघांना भेटी दिल्या आहेत. प्रत्येक गल्लीत जाण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु सर्व ठिकाणी केवळ भगवे वातावरण दिसत आहे. आघाडी सरकारच्या काळात कोणताही विकास झाला नाही. त्यांनी जे पाप केले, ते पुसण्यात युतीची ५ वर्ष गेली. पुढील पाच वर्षात महाराष्ट्र घडवायचा असून मुंबईचे विकासाचे मॉडेल महाराष्ट्रात न्यायचे आहे.

ते पुढे म्हणाले की, मुंबईत महापालिकेची सर्वात सुसज्ज रुग्णालये आहेत. १७,५०० बेड आहेत, इतक्या मोठ्या प्रमाणात कोणत्याही शहरात बेड नाही. तिथे चांगल्या पद्धतीचे उपचार मिळतात. मात्र ग्रामीण भागात या प्रकारचे उपचार मिळत नाही. त्यांना मुंबईला यावे लागते. संपूर्ण महाराष्ट्रात या दर्जाची आरोग्यसेवा मिळायला हवी असे ते म्हणाले.

ज्यांना काम सुरू होण्याच्या आधीच मनात प्रश्न आहेत, त्यांच्यात काम करण्याची धमक नाही, त्यांनी प्रश्न विचारू नये. आम्ही १० जेवणाचे आश्वासन दिले तर ते पूर्णपण करून दाखवू असे त्यांनी आघाडीच्या नेत्यांना सुनावले.