वंचित आघाडी आणि एआयएमआयएमची पुन्हा युती?, इम्तियाज जलील यांचे संकेत

Imtiaz Jaleel

मुंबई : जागा वाटपाच्या मुद्द्यावरून ऐन निवडणुकीच्या तोंडावर एआयएमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीची युती तुटल्याची घोषणा मागील आठवड्यात जाहीर करण्यात आली. त्यानंतर पुन्हा एमआयएम आणि वंचित आघाडीची युती होणार असल्याचे संकेत मिळत आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी याला दुजोरा दिला आहे. “वंचित आघाडीसोबत जाण्यावर पक्ष पुर्नविचार करीत आहे. पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही जागांबाबत तडजोड करण्यास तयारी दर्शवली आहे”, अशी माहिती ओवेसी यांनी दिली. एनडीटीव्हीने पीटीआयच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

“२८८ पैकी ८ जागा एमआयएमसाठी सोडत असल्याने युती तोडत आहे”, असे एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले होते. तसेच “वंचितसोबतची युती तोडण्याचा मोठा निर्णय मी पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या परवानगीशिवाय घेऊ शकत नाही. हा निर्णय पक्षाचे अध्यक्ष ओवेसी यांनीच घेतला आहे”, असे जलील म्हणाले होते.

दरम्यान, खासदार इम्तियाज जलील यांच्याशी पीटीआयने संवाद साधला. वंचितसोबत जाण्यासंदर्भात यावेळी बोलताना जलील म्हणाले,”एमआयएम-वंचित आघाडी युती होणे अवघड आहे, असं मला वाटत नाही. मोठा भाऊ म्हणून प्रकाश आंबेडकर यांनी जागा वाटपावर तोडगा काढला, तर पुन्हा नव्याने सुरूवात करण्याची आमची इच्छा आहे. प्रकाश आंबेडकरांनी असदुद्दीन ओवेसींसोबत पुन्हा चर्चा करण्याची तयारी दर्शवली तर आम्ही तयार आहोत”, असे जलील म्हणाले.

दोन्ही पक्षात समेट घडवून आणण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनीच का पुढाकार घ्यावा, या प्रश्नावर जलील म्हणाले”, “वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ईमेलवरून खासदार ओवेसी यांना जागा देण्याचा प्रस्ताव पाठवला. त्यामुळे ओवेसी नाराज झाले. “मी बाळासाहेबांचा प्रचंड आदर केला. त्यांनी एक फोनतरी मला करायचा होता. त्यानंतर आपण चर्चा केली असती. पण ईमेलद्वारे जागावाटपाचा प्रस्ताव पाठवणे हे धक्कादायक आहे”, अशी प्रतिक्रिया ओवेसी यांनी दिल्याचे जलील यांनी सांगितले.

वंचित आणि एमआयएम आघाडी होण्याची काही आशा आहे, का यावर जलील यांनी होकारार्थी उत्तर दिले. ते म्हणाले,”काँग्रेस आणि राष्ट्रवादीची अवस्था अत्यंत हलाखीची झाली आहे. लोकांना असा पर्याय नकोसा झाला आहे. त्यामुळे मतदार दुसरा पर्याय म्हणून एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीकडे बघत आहेत. एमआयएम किती जागा लढवेल हे याबाबत आताच निश्चित सांगता येणार नाही. पण जास्तीत जास्त ६० जागा आम्ही लढू. ही संख्या आम्ही पार करणार नाही”, अशी माहितीही जलील यांनी पीटीआयला दिली.