युती फाटली, किल्ली पवारांकडे?

CM-Uddhav_Pawar

badgeमहाराष्ट्र राज्य अस्थिरतेच्या गर्तेत फेकल्या गेले आहे. ज्यांना जनतेने बहुमताचा कौल दिला त्या महायुतीत बिनसलं आहे. भाजप आणि शिवसेना यांनी युती तुटल्याचे जाहीर केले नसले तरी मनं तुटली आहेत. ती जुळणे अवघड आहे. राज्याची सत्तेची समीकरणं बदलत आहेत. दोन्ही काँग्रेस याचा कसा फायदा उठवतात त्यावर नवा मुख्यमंत्री कुणाचा ते ठरणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यपालांनी त्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहायला सांगितले आहे. पण ही स्थिती फार काळ चालू शकत नाही. राज्यपाल आता नवे सरकार स्थापनेचे प्रयत्न सुरू करतील.

ही बातमी पण वाचा : यापुढे जे सरकार येईल ते भाजपच्या नेतृत्वाखालीच येणार -देवेंद्र फडणवीस

भाजपच सत्ता स्थापन करणार असे निरोपाच्या पत्रपरिषदेत फडणवीस यांनी सांगितले. शिवसेनेसोबत भाजपचे मधुर संबंध राहिलेले नाहीत हे आज उघड झाले. त्यामुळे भाजप किंवा शिवसेना यांना दोन्ही काँग्रेसची मदत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कोणाचाही होवो, सत्तेची किल्ली पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांच्या हाती आली आहे. राष्ट्रवादीला घेऊन तयार झालेल्या सरकारला बहुमत दाखवता आले नाही तर राज्याला राष्ट्रपती राजवटीशिवाय पर्याय नाही. तसे झाले तर काही महिन्यांनी राज्याला निवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपशी पंगा घेण्याचा जुगार का खेळला हे आज तरी कोडे आहे. त्यांना आपला मुख्यमंत्री बसवायचा आहे. पण त्यासाठी उद्धव यांना एका काँग्रेसची मदत घेऊन चालणार नाही. दोन्ही काँग्रेस सोबत घ्याव्या लागतील तरच १४५ चा बहुमताचा आकडा जमू शकतो. सोनिया शिवसेनेसोबत बसायला आज तरी तयार नाहीत.

ही बातमी पण वाचा : आमची खंत दूर होणार असेल तर, सेनेसाठी चर्चेची दारं खुली – फडणवीस

पवार कुठे जातात त्यावर पुढचे सरकार ठरणार आहे. विरोधी पक्षात बसण्याची पवारांची आतापर्यंतची भूमिका आहे. पण बदललेल्या परिस्थितीत पवार भूमिका बदलू शकतात. पवार शांत बसणार नाहीत. ते कुठे बसतात त्यावर राजकारणाची दिशा ठरणार आहे. पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबंध पाहता राष्ट्रवादी काँग्रेस भाजपजवळ जाऊ शकते. प्रश्न उद्धव यांच्या रणनीतीचा आहे. त्यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा हट्ट का धरला असावा? हे डावपेच कुणाच्या डोक्यातून आले असावेत? राजकारणात काहीही शाश्वत नसते. हे ट्वेन्टी-ट्वेन्टी क्रिकेटसारखे आहे. सारेच करार पाळायचे नसतात हे साधे गणित उद्धव यांना कळत नसावे? उद्धव शब्दाची, बांधिलकीची गोष्ट करतात; पण हल्लीचे राजकारण तसे राहिलेले नाही. अडीच वर्षांचा करार शहा आणि उद्धव ह्या दोघांमध्ये झाला, असे उद्धव म्हणतात. तसे असेलही. पण फडणवीस, शहा हे दोघेही तसे ठरलेच नव्हते, असे म्हणाले आहेत. कोण खोटे बोलतेय हे कसे ठरवणार? ह्या संकटाला वेगळ्या पद्धतीने उद्धव यांना सामोरे जाता आले असते. ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री हे ढोबळ सूत्र त्यांना अमान्य का? आदित्यसाठी त्यांनी हा सत्ता खेळला असेल तर त्यांनी मुलाचे नुकसान केले असेच म्हणावे लागेल.

ही बातमी पण वाचा :उद्धव ठाकरेंनी माझे फोन घेतले नाही मात्र राष्ट्रवादी व इतरांशी ते बोलत होते : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आता युतीत परत यायचे असेल तर उद्धव यांना मोदी-शहा जोडीपुढे नाक रगडावे लागेल. दुसरे म्हणजे संजय राऊत यांना बाजूला करावे लागेल. कारण नसताना राऊत यांनी रोज टीकेचा रतीब घालून दूध नासवले. राऊत गप्प राहिले असते तर एवढे फाटले नसते. पण उद्धव यांच्या टीमने निकालाच्या तारखेपासून भाजपपासून वेगळे होण्याची मानसिकता बनवली होती असे दिसते. कुणाच्या ताकदीवर उद्धव हा गेम खेळले? ह्या प्रश्नाचे उत्तर भविष्यातच मिळू शकते. मोदींना शिवसेना संपवायची आहे; पण त्याची सुरुवात एवढ्या लवकर होईल असे वाटले नव्हते.