युतीचा फॉर्म्युला बनला सस्पेन्स

Patil-Uddhav

badgeविधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युती होणार की नाही आणि झाली तर जागावाटप काय राहणार? गेला महिनाभर हा विषय गाजतो आहे. चघळला जात आहे. ‘आमचं ठरलंय’ असे दोन्ही बाजूंचे  नेते वारंवार सांगत होते. पण निवडणूक काही दिवसांवर आली असताना ‘काय ठरलंय’ हे सांगायला कुणीही तयार नाही. जागावाटप फॉर्म्युल्याचा सस्पेन्स दिवसेंदिवस वाढतो आहे. आज तर कहर झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फॉर्म्युला तुमच्यासमोरच ठरला होता, असे पत्रकारांना सांगितले. पण भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी मात्र अंतिम फॉर्म्युला अजून ठरला नाही, असे स्पष्ट केले. कोण कुणाला बनवतोय? घोडे कुठे अडते? दोन काँग्रेसची आघाडी आणि जागावाटप जाहीर झाले असताना सत्ता पक्षातली आघाडी का माघारलीय? उद्या सत्तेत बसणारे पक्ष अशी फिरवाफिरवी करत असतील तर जनतेने कुणाकडे पाहायचे?

ही बातमी पण वाचा : युती १०० टक्के होणार

लोकसभा निवडणुकीपूर्वी लोकसभेसाठी युती झाली तेव्हाच म्हणजे पाच महिन्यांपूर्वी विधानसभेसाठी दोघांनी निम्म्या-निम्म्या जागा वाटून घेण्याचे भरपत्रपरिषदेत जाहीर झाले होते. पण राजकारणात काहीच शाश्वत नसते असे म्हणतात, तेच खरे. लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षेबाहेर जनादेश मिळाला. पुढे ३७० कलम पंतप्रधान मोदींनी रद्द केल्याने महाराष्ट्रातच नव्हे तर देशात मोदींची लाट आहे. त्यात भर म्हणजे दोन्ही काँग्रेसला गळती लागली. दिग्गज नेते भाजपमध्ये आले आहेत. भाजप हाऊसफुल्ल झाल्याने काही नेत्यांना शिवसेनेत पाठवावे लागत आहे. ह्या बदललेल्या हवेमुळे फॉर्म्युलाही बदलणे स्वाभाविक आहे. पण शिवसेना नेते अडून बसले आहेत. जुन्या कराराचा आधार घेऊन भाजपला शिवसेनेने  कोंडीत पकडले आहे. काल नाशिकच्या सभेत मोदींनी शिवसेनेचे नावही घेतले नाही. उलट राम मंदिराच्या मुद्यावर ठोकून काढले. त्यामुळे भाजपने स्वबळाची तयारी केल्याची हवा पसरली. अशा हवेत तिकीट इच्छुकांचा रक्तदाब वाढतो आहे. शेवटी काय होणार युतीचे?

 काहीही गडबड होणार नाही. राष्ट्रीय नेत्याची भाषणे अशीच असतात. सारे सांगून टाकले तर निवडणुकीची मजाच संपेल. त्यामुळे युती होणार. हजार टक्के होणार. तुम्ही लिहून ठेवा. जागावाटपाच्या चर्चेचे गुऱ्हाळ नेहमीच लांबत असते. प्रत्येक निवडणुकीचा हा अनुभव आहे. दोन काँग्रेसच्या आघाडीचे गुऱ्हाळही असेच लांबत असे. सध्या पितृपक्ष सुरू आहे. तो आटोपला की मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र बसतील आणि दोन मिनिटांत  सारे अडथळे संपतील आणि युतीची घोषणा होईल. उद्धव हेही फार ताणून धरणार नाहीत. निकालानंतर एकत्र सत्तेत यायचेच आहे तर मग आधी का नाही, असा हा सरळ मामला आहे.