
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी आज थेट गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करून खळबळ उडवून दिली. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे (Sachin Vaze) यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. त्याबाबतचे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राज्यपालांना दिले आहे. त्यांच्या या आरोपानंतर विरोधी पक्ष भाजपने अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरली आहे. परमबीर सिंग यांनी केलेले आरोप अत्यंत खळबळजनक आहेत. हे प्रकरण अत्यंत गंभीर असून त्यामुळे मुंबई पोलिसांची मान खाली गेली आहे. या प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नैतिकतेतून राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी लिहिलेले पत्र खळबळजनक नाही तर अत्यंत धक्कादायक आहे. परमबीर सिंग यांनी पत्रात जोडलेले चॅट हा सबळ पुरावा आहे. ते स्वत: पोलीस दलातील अधिकारी असून त्यांनी केलेले आरोप हे गंभीर स्वरूपाचे आहेत. ज्या प्रकारे महाराष्ट्राच्या पोलीस विभागात धक्कादायक प्रकरण उघडकीस येत आहेत. पोलीस दलाचं खच्चीकरण होताना दिसत आहे. गृहमंत्री आपल्या पदावर राहू शकत नाहीत. गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे किंवा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
राज्याचे गृहमंत्रीच पोलिसांना वसुली करायला सांगणं ही गंभीर गोष्ट आहे. पोलीस दलाचं खच्चीकरण करण्याचा हा प्रकार आहे. ही घटना म्हणजे कळस आहे. इतक्या वाईट प्रकारे ही परिस्थिती समोर आल्याने देशमुख पदावर राहू शकत नाहीत. त्यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, असं सांगतानाच या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी झाली पाहिजे. सेंट्रल एजन्सीकडून ही चौकशी व्हावी. सेंट्रल एजन्सी नको असेल तर कोर्टाच्या अंतर्गत ही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.
देशमुखांवर करण्यात आलेला आरोप हा राजकीय नाही. कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीने हा आरोप केलेला नाही. त्यामुळे या प्रकरणी तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही फडणवीस यांनी केली. या प्रकरणात सरकारने नैतिक जबाबदारी स्वीकारली पाहिजे. जे बोलतात ते कृतीत उतरवलं पाहिजे, असं सांगतानाच परमबीर सिंग यांनी हे प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या नजरेला आणून दिले असेल तर त्यावर वेळीच कारवाई झाली पाहिजे होती. तेव्हा कदाचित सरकार चालवण्यासाठी धोका असल्याचे लक्षात आल्याने कारवाई केली नसावी, असा टोलाही त्यांनी लगावला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला