अष्टपैलू क्रिकेट खेळाडू बापू नाडकर्णी यांचे निधन

मुंबई :- भारताचे माजी अष्टपैलू कसोटीपटू बापू उर्फ रमेशचंद्र गंगाराम नाडकर्णी यांचे मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई, नातू आहेत. बापू पवईत हिरानंदानी गार्डन येथे मुलीकडे राहत होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली.

बापू नाडकर्णी सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटपटूंपैकी एक होते. जगातला सर्वात कंजूष फिरकी गोलंदाज अशी त्यांची ख्याती होती. १९५५ ते १९६८ यादरम्यान ते भारतीय कसोटी संघात होते. बापू १९५०-५१ मध्ये पुणे विद्यापीठाकडून रोहिंटन बरिया चषकात खेळले. त्यानंतर १९५१-५२ मध्ये महाराष्ट्राच्या संघातून त्यांनी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. दोन वर्षांनंतर ब्रेबॉर्न स्टेडियमवर तेव्हाच्या बॉम्बे संघाविरुद्ध त्यांनी आपले पहिले शतक झळकावले. १०३ मिनिटांत त्यांनी शतक काढले होते. प्रथमश्रेणी क्रिकेटमधील सातत्यपूर्ण अष्टपैलू कामगिरीच्या बळावर त्यांनी भारतीय संघात निवड झाली. १९५५-५६ मध्ये फिरोजशहा कोटला मैदानावर न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात बापूंनी आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले. विनू मंकड यांना विश्रांती देवून बापूंना संधी देण्यात आली होती.

कंजूष गोलंदाज

कसोटीत सलग २१ षटके निर्धाव टाकण्याचा विश्वविक्रम बापूंनी १४ जानेवारी १९६४ रोजी इग्लंडविरुद्ध केला होता. चेन्नईच्या (तेव्हाचे मद्रास) मैदानावर हा सामना झाला होता. बापू डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करायचे. इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात त्यांनी ३२ षटके टाकली. त्यातील २७ निर्धाव होती. ३२ षटकांत त्यांनी १.६७ च्या सरासरीने केवळ ५ धावा दिल्या होत्या. बापूंचा हा विश्वविक्रम अबाधित आहे. बापूंच्या गोलंदाजी सरावाचीही तेव्हा नेहमी चर्चा असायची. नेटमध्ये सराव करताना नाणे ठेवून ते सराव करायचे. नाण्याचा अचूक वेध घेऊन मारा करण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा.