आंबेनळी अपघात : प्रकाश सावंत यांची चौकशी करा

मृतांच्या कुटुंबियाचे मुख्यमंत्र्यांना पत्र

दापोली : आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघातात बळी गेलेल्यांचे नातेवाईक, हा अपघात नेमका कसा झाला याचा शोध घेण्याच्या मागे आहेत.

या अपघातात बसमधील ३४ प्रवाशांपैकी फक्त प्रकाश सावंत हे एकटेच वाचले. हा अपघात कसा झाला याबाबत त्यांची चौकशी करावी, अशी मागणी मृतांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रपाठवून केली आहे. अपघात झाला त्यावेळी बस कोण चालवत होते हे कळाले पाहिजे, असे या पत्रात म्हटले आहे.

मृतांच्या कुटुंबियांच्या नातेवाईकांपैकी एक, संजय गुरव याबाबत एका वाहिनीशी बोलतांना म्हणाले की, या अपघातासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून चौकशीची मागणी केली आहे.

मृतांच्या कुटुंबियांनी पत्रात म्हटले आहे की – एकटेच प्रकाश सावंत कसे काय वाचले? ते नेमके कुठे बसले होते? ते एकटेच कसे बाहेर फेकले गेले? शेवाळ लागलेल्या कातळावरुन ते कसे वर आले? प्रकाश सावंत यांनी माध्यम आणि पोलिसांना दिलेल्या जबाबात तफावत आहे.

२८ जुलैला दापोली कृषी विद्यापीठाचे कर्मचारी, विद्यार्थी आणि चालक असे ३४ जण दापोली येथून महाबळेश्वरला सहलीसाठी निघाले होते. आंबेनळी घाटात एका वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस दरीत कोसळून ३३ जणांचा मृत्यू झाला, असे या अपघाताबाबत सांगण्यात येते आहे.