५ जूनपूर्वी सर्व नोंदणी धारकांचा कापूस खरेदी करणार – संजय राठोड

Sanjay Rathod

यवतमाळ : जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी लॉकडाऊन कालावधीत 20 ते 30 एप्रिल 2020 दरम्यान कापूस विक्री नोंदणी केली होती. त्यापैकी शिल्लक असलेल्या एकूण 17 हजार 500 वैध नोंदणी धारकांचा कापूस 5 जून 2020 पूर्वी खरेदी केला जाईल, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आलेल्या बैठकीनंतर झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यवतमाळ जिल्ह्यात 2019-20 च्या कापूस हंगामात आजपर्यंत एकूण 2 लक्ष 45 हजार 454 कापूस उत्पादकाकडून 50 लक्ष 27 हजार 172 क्विंटल कापूस खरेदी केला आहे. कोरोनाच्या प्रभावामुळे लॉकडाऊन काळात दिनांक 24 मार्च ते 2 मे 2020 पर्यंत कापूस खरेदी बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना बराचसा त्रास सहन करावा लागला, असेही पालकमंत्री म्हणाले.

लॉकडाऊन कालावधीमुळे कापूस खरेदीबाबत सूक्ष्म नियोजन करून दिनांक 20 ते 30 एप्रिल 2020 दरम्यान एकूण 30 हजार 876 उत्पादकांनी बाजार समित्यांमध्ये नोंदणी केली. जिल्ह्यातील एकूण 52 जिनिंगपैकी 44 जिनिंग हे सीसीआय व कॉटन फेडरेशन यांच्यासोबत करारबध्द होते. परंतु लॉकडाऊनमुळे परप्रांतात मजूर गेल्यामुळे 28 जिनिंग तातडीने सुरु करण्यात आले असून पुन्हा कापूस खरेदी सुरु केली. 22 मेपर्यंत एकूण 12 हजार नोंदणीकृत कापूस उत्पादकाकडून 3 लक्ष 19 हजार 534 क्विंटल कापूस सीसीआय व कापूस फेडरेशनने खरेदी केला. खाजगी खरेदी धारकांमार्फत 2 लक्ष 70 हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. आज अखेर एकूण 17 हजार 432 कापूस उत्पादकांचा माल खरेदी करणे बाकी आहे. त्याबाबतचे नियोजन करण्यात आले असून दिनांक 5 जून पर्यंत दररोज 900 वाहनानुसार कापूस खरेदी करण्यात येईल. यानुसार अंदाजे 4.50 लक्ष क्विंटल कापसाची खरेदी अपेक्षित आहे, अशी माहिती उपजिल्हा निबंधक, सहकारी संस्था यांनी दिली आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांची नोंदणी बाकी असेल त्यांनी संबंधित सहाय्यक निबंधक कार्यालयात सर्व पुराव्यासह (सातबारा, आधारकार्ड, पेऱ्याचा पुरावा, बँक खात्याची प्रत आदी) अर्ज करावा व नोंदणी करावी.

नोंदणीकृत कापूस उत्पादकांचा सर्व्हे : जिल्ह्यामध्ये 20 मे पासून तालुकास्तरावर सर्व्हे सुरु करण्यात आला आहे. ज्यांच्याकडे कापसाचा साठा असेल अशा उत्पादकांना बाजार समितीमार्फत टोकन देऊन कापूस खरेदी बाबत एसएमएस पाठविण्यात येईल. एसएमएस मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी आपला कापूस बाजार समितीत किंवा जिनिंगमध्ये विक्रीकरीता आणावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सीसीआयच्या निकषानुसार 40 क्विंटलच्या वर एका शेतकऱ्याकडून कापूस खरेदी करता येत नाही. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याचा कापूस आपल्या नावावर विक्री करू नये. तसे आढळून आल्यास त्या कापसाचे चुकारे थांबविण्यात येतील, असे निर्देश देण्यात आले आहेत.

तूर व चना खरेदी केंद्र 15 जूनपर्यंत सुर राहणार : जिल्ह्यात चालू हंगामात एकूण 49 हजार 912 शेतकऱ्यांनी तुर नोंदणी केली असून आजपर्यंत जिल्ह्यातील 16 केंद्रावर 96 हजार 306 क्विंटल तुर खरेदी करण्यात आली आहे. तसेच एकूण 6 हजार 511 शेतकऱ्यांकडून चना विक्रीची नोंदणी करण्यात आली असून आतापर्यंत एकूण 49 हजार 642 क्विंटल चना खरेदी करण्यात आला आहे. 15 जूनपूर्वी 9 हजार क्विंटल चना खरेदी करण्यात येईल. जिल्ह्यातील कर्जवाटप, कापूस खरेदी, चना व तूर खरेदी याबाबत शेतकऱ्यांनी कोणत्याही भुलथापास बळी पडू नये व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री यांनी केले आहे.

सर्व मुस्लिम बांधवांचे पालकमंत्र्यांकडून आभार : मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान सण काल जिल्ह्यात साजरा झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रमजान ईदनिमित्त सर्व समाज बांधवांनी शासन आणि प्रशासनाच्या आदेशाचे पालन करून हा सण अतिशय साध्या पध्दतीने साजरा केला. मुस्लिम बांधवांनी प्रशासनाच्या आवाहनावरून आपापल्या घरातच नमाज अदा केल्याने कुठेही गर्दी झाली नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे अतिशय उल्लेखनीय कार्य आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने सर्व समाजबांधव अभिनंदनास पात्र आहेत. यापुढेही शासन आणि प्रशासनाच्या सर्व सूचनांचे पालन करावे, असे सांगून पालकमंत्री संजय राठोड यांनी मुस्लिम बांधवांचे आभार मानले.


Source:- Mahasamvad News

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER