सगळे पक्ष मराठा समाजाच्या पाठिशी ठामपणे उभे आहेत, आंदोलन करू नका; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Uddhav Thackeray

मुंबई : मराठा आरक्षण प्रकरणात सर्व पक्ष सोबत आहेत. यासाठी तज्ज्ञांशी संवाद सुरू असून आम्ही एक मार्ग, एक दिशा ठरवण्याच्या जवळ आलो आहोत. उद्या किंवा परवा याबद्दलचा निर्णय जाहीर करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) दिली आहे. ते म्हणाले, सरकार मराठा समाजाच्या खंबीरपणे पाठीशी आहे. तसेच, मराठा आरक्षणाचा निर्णय सर्व पक्षांनी मिळून घेतला होता.

आताही सगळे पक्ष मराठा समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. विरोधकांनीदेखील सरकारला सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं आहे, असं सांगत सर्व पक्ष तुमच्यासोबत आहेत. त्यामुळे आंदोलनं करू नका, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मराठा समाजाला केलं आहे. दरम्यान, मराठा समाजासाठी आणखी एक दिलासादायक बाब म्हणजे, मराठा समाजाकडून येणाऱ्या प्रतिक्रिया लक्षात घेता राज्य सरकार मेगा पोलीस भरतीत मराठा समाजासाठी १३ टक्के जागा राखीव ठेवण्याबाबत विचार करत आहे.

मराठा समाजाचं आरक्षण टिकावं यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. परंतु पोलीस भरतीत १३ टक्के जागा ठेवण्याबाबत कायदेशीर बाब तपासून पाहणार, असं आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलं आहे.

पोलीस मेगा भरती

राज्यात पोलीस शिपायांची १२ हजार ५२८ पदे भरण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. एवढी मेगा भरती राज्यात पहिल्यांदाच होत आहे. राज्यात सध्या पोलीस शिपायांची संख्या ९७ हजार इतकी आहे. शिपायांमधून पदोन्नती मिळालेले पोलीस नाईक ४२ हजार, हेड कॉन्स्टेबल ४३ हजार आणि एएसआय २० हजार अशी संख्या आहे. नव्या भरतीमुळे सध्याच्या यंत्रणेवरील भार हलका होईल. २०१९ आणि २०२० या वर्षांत १२ हजार ५०० पदे भरण्याचे नियोजन गृह विभागाने केलेले आहे. २०१९ मध्ये ५२९७ पदांच्या भरतीसाठी जाहिरात काढली होती. मात्र, राज्य शासनाच्या ४ मे २०२० च्या आदेशानुसार सर्वच प्रकारच्या शासकीय नोकर भरतीस मनाई करण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER