सहकुटुंब सहपरिवार

Mrinal Kulkarni Family

अभिनय, दिग्दर्शन या क्षेत्रात असलेल्या कित्येक फॅमिलीबाबत आपण ऐकतो, पाहतो. वडील आणि मुलगी किंवा आई आणि मुलगा एकत्र कॅमेरासमोर येतात हे देखील आपल्याला माहिती आहे. वडील मुलाच्या किंवा मुलीच्या सिनेमाचे दिग्दर्शक असतात हेपण नवीन नाही. थोडक्यात काय, तर सिनेमा, मालिका इंडस्ट्रीत असलेले कुटुंब हा नेहमीच चर्चेचा आणि उत्सुकतेचा विषय आहे. पण हे जरा हटके आहे की वडील आणि आई अभिनय करत आहेत आणि त्यांचा दिग्दर्शक म्हणून त्यांचा मुलगा त्यांना सीन सांगतोय. हो, कोरोनाच्या लॉकडाउन काळात एका चहाच्या कंपनीची जाहीरात तुम्ही पाहिलीच असेल, ज्यामध्ये कोरोनाबाधित शेजाऱ्याला चहा नेऊन देणारी जाहीरातीतील नायिका सांगतेय की त्यांना एकटं राहू द्या…एकटे सोडू नका. या जाहीरातीत अभिनय केलाय तो अभिनेत्री मृणाल आणि तिचे पती रूचिर कुलकर्णी यांनी आणि ही जाहीरात दिग्दर्शित केली आहे विराजस कुलकर्णीने. त्यामुळे सहकुटुंब सहपरिवार केलेल्या या जाहिरातीचे मोल माझ्यासाठी खास आहे असं अभिनेत्री मृणाल कुलकर्णीने शेअर केलं आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढायला लागल्यानंतर मार्चमध्ये सगळं लॉकडाउन झालं. मालिकांचे चित्रीकरणही बंद झाल्याने जुने एपिसोड दाखवले जात होते. सगळीकडे फक्त कोरोनाचे भीतीदायक वातावरण होते. मनोरंजन इंडस्ट्री जिथल्या तिथे थांबली असल्याने कलाकारही घरीच बसून होते. काही दिवस असलेले पॅकअप काही वेगळ्या प्रयोगांनी संपावे अशा विचार सुरू झाला आणि घरातूनच शूटिंग करून काही करता येईल का यावर काम सुरू होतं. अशाच प्रयोगातून चहा कंपनीकडून मृणाल कुलकर्णीला एक जाहीरात करण्याची ऑफर आली. खरं तर मरगळलेल्या रूटीनमध्ये अशी काही ऑफर येणे हेच मृणालसाठी भारी होते. याचा किस्सा शेअर करताना मृणाल सांगते,

लॉकडाउनमुळे घरात बसून कंटाळा आला होता. काही काम सुरू होईल याची आशा नसताना चहाच्या जाहीरातीसाठी विचारणा झाली. या जाहिरातीला कोरोना जागृतीचा टच देण्याचा त्यांचा विचार होता. कोरोनाची लागण झालेल्यांसाठी अनेक शेजाऱ्यांनी खूप मदत केली. याच वन लाइन स्टोरीवर ही जाहीरात करायची होती. अर्थात ही जाहीरात शूट होणार होती मृणालच्या पुण्याच्या घरी. कोरोनामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. मग काय, विराजस हा ट्रेंड लेखक आणि दिग्दर्शक असल्यामुळे मी आणि रूचिर यांनी जाहिरातीत काम करायचे आणि ती जाहीरात विराजसने दिग्दर्शित करायची असं ठरल्यामुळे या कामाबाबत मला वेगळीच उत्सुकता वाटली. पडद्यावर जी जाहिरात दिसते त्यामध्ये मी आणि रूचिरने पहिल्यांदा एकत्र काम केलेय आणि जाहिरातीचे शूटिंग, दिग्दर्शन हे सगळं विराजसने केले आहे.

एरव्ही जाहीरातीची ऑफर आली की कलाकार म्हणून फक्त शूटींगला जायचे इतकेच काम असते. फारतर लेखकाकडून लिहून येणारे संवाद म्हणायचे हाच टास्क असतो. पण मृणाल, रूचिर आणि विराजस या तिघांसाठीही ही जाहिरात म्हणजे वेगळाच अनुभव होता. चहाची जाहिरात असल्याने किचनमध्ये चहा बनत असल्याचा शॉट, कपबशीचे डिझाईन, ड्रेसिंग सेन्स, घराचा लूक हे ठरवणंही महत्वाचं होतं. मृणाल त्यासाठी वेगवेगळ्या कपबशांचे फोटो काढून चहाच्या कंपनीच्या प्रतिनिधीला पाठवायची. त्यातून कोणते कप जाहिरातीत वापरायचे यावर फोनवरून किंवा व्हॉटसअॅपवर संवाद व्हायचा. मग विराजसने त्यासाठी स्क्रिप्ट लिहिली. हा सगळाच अनुभव या तिघांसाठीही भन्नाट होता. मृणालच्या पुण्यातील घरातच ही जाहीरात शूट करण्यात आली. त्या जाहीरातीची खूप चर्चा झाली होती.

मृणाल आणि विराजस हे दोघेही अभिनयात अॅक्टीव्ह आहेत. पण रूचिर बऱ्याच दिवसात कॅमेऱ्यासमोर नसल्याने त्यालाच टेन्शन आलं होतं. पण समोर शूट करण्यासाठी मुलगाच होता आणि सोबत सहनायिका म्हणून बायको मृणाल असल्याने सगळं सोपं आणि सहज झालं. कोरोनामुळे अनेकांच्या आयुष्यात वेगळ्याच अनुभवांची भर पडली आहे. कलाकार म्हणून मृणाल, रूचिर आणि विराजसने एकत्रित घरातूनच शूट केलेली ही जाहीरात आजही एकत्र चहा पिताना त्यांना नेहमी आठवते आणि या जाहिरातीत देण्यात आलेला कोरोनाबाधितांना दूर लोटू नका हा संदेश देण्यात आपले योगदान देता आले याचा आनंदही होतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER