आॕल इंग्लंड बॕडमिंटनची चार विजेतेपदं जपानकडे, मलेशियाचा ली झी पुरुषांत चॕम्पियन

Maharashtra Today

प्रतिष्ठेच्या आॕल इंग्लंड बॕडमिंटन स्पर्धेत मलेशियाचा ली झी जिया (Lee Zii Jia) आणि जपानची नोझोमी ओकुहारा (Nozomi OKuhara)  यांनी एकेरीच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. ली झी याने अंतिम सामन्यात डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसनवर(Victor Axelsen)  30-29, 20-22, 21- 9 असा विजय मिळवला. त्याआधी त्याने माजी विजेत्या केंटो मोमेटोलाही मात दिली. या दोन दिग्गजांना लागोपाठच्या सामन्यात मात देऊन ली झी याने बॕडमिंटन जगताला आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्याने पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकली आहे. गेल्या वर्षी योगायोगाने अंतिम सामन्यात एक्सेलसेननेच त्याचा पराभव केला होता. त्याचा हिशेब यावेळी ली झी याने चुकता केला.

महिला एकेरीत पी.व्ही. सिंधूचे आव्हान उपांत्य फेरीत संपवणारी चोचूवोंग हिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतिम सामन्यात नाझोमी ओकुहाराने तिच्यावर 21-12, 21-16 असा विजय मिळवला.

ली आणि एक्सेलसनदरम्यानचा पहिला गेम कमाल 59 गुणांपर्यंत पोहचला. त्यात 22 वर्षीय ली याला एक्सेलसेनने तब्बल 9 मॕचपाॕईंटचा लाभ घेऊ दिला नाही पण शेवटी दहाव्यावर ली याने बाजी मारली.

दुसऱ्या गेममध्ये गतविजेत्या एक्सेलसेनने 14-18 अशा पिछाडीवरुन गेम जिंकत लढत बरोबरीवर आणली. पण आधीच्या प्रत्येक सामन्यात जबरदस्त संघर्ष करावा लागल्याने शारीरिक व मानसिक थकव्याचा परिणाम एक्सेलसेनच्या खेळावर दिसून आला आणि त्यांने तिसरा व निर्णायक गेम 21-9 असा गमावला.

2016 चा आॕलिम्पिक कास्यपदक विजेता असलेल्या एक्सेलसनला आधीच्या चार पैकी तीन लढती जिंकण्यासाठी पूर्ण तीन गेम खेळावे लागले होते.दुसरीकडे ली ने मात्र सरळ गेममध्ये सामने जिंकत अंतिम फेरी गाठली होती. याबद्दल एक्सेलसन म्हणाला की, पहिल्या दोन सामन्यांतच माझी खूप शक्ती खर्च झाली होती. पण ली हाच विजेतेपदाचा हक्कदार आहे.  ली झी म्हणाला की माझ्या भावना व्यक्त करू शकत नाही अशी माझी स्थिती आहे. मी आनंदी आहे, दुःखी आहे, उत्साहीत आहे अशा माझ्या संमिश्र  भावना आहेत. माझ्यासाठी हे खास क्षण आहेत.

महिला एकेरीची विजेती ओकुहारा म्हणाली की, पाच वर्षांपूर्वी मी येथे विजेती ठरले तेंव्हा फारसे दडपण नव्हते पण आता मी जगातील पहिल्या पाच खेळाडूत असल्याने स्थिती बदलली आहे. पण खेळही उच्च स्तरावर पोहोचलाय त्यामुळे मी आनंदी आहे.

दुहेरीवर तर जपानचे पूर्णपणे वर्चस्व राहिले. तीन्ही गटाच्या अंतिम लढती जपानी जोड्यांदरम्यानच झाल्या. त्यात युता वाटानाबे पुरुष व मिश्र दुहेरीच्या विजेतेपदासह दुहेरी मुकूटाचा मानकरी ठरला.

पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात हिरोयुकी एन्दो व  वाटानाबे या जोडीने ताकेशी कामुरा व किगो सोनोदा यांना 21-15, 17-21, 21-11 अशी मात दिली.

मिश्र दुहेरीच्या विजेतेपदात एरिसा हिगाशिनो ही वाटानाबेची साथीदार होती. त्यांनी युकी कानेको व मिसाकी मात्सुतोमो यांच्यावर 21-14, 21-13 असा विजय मिळवला.

महिला दुहेरीत मायू मात्सुमोतो व वकाना नगाहारा जोडी विजेती ठरली. त्यांनी युकी फुकूशिमा व सयाका हिरोता यांना 21-18, 21-16 अशी मात दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER