अलकाताईंच्या वाट्याला आली दैवी भूमिका

Alka Kubal

‘माहेरची साडी’ आठवला की पहिलं नाव डोळ्यांसमोर येतं ते अभिनेत्री अलका कुबल (Alka Kubal) यांचं. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेली अभिनेत्री म्हणून अलका कुबल यांचं नाव घेतलं जातं. आजवर अनेक दर्जेदार सिनेमांतून त्यांनी अप्रतिम भूमिका साकारल्या आहेत. अभिनयातला सहज सोपेपणा त्यांच्या अभिनयातून बघायला मिळतो. अलका कुबल लवकरच छोट्या पडद्यावर भूमिका साकारणार आहेत. सोनी मराठीच्या ‘आई माझी काळूबाई’ या आगामी मालिकेत त्या मुख्य भूमिका साकारणार आहेत. या मालिकेत त्या आई काळूबाईची भूमिका साकारणार आहेत. अनेक दिगग्ज अभिनेत्यांसोबत त्यांनी आजवर काम केलंय आणि आता त्या छोट्या पडद्यावर काम करणार आहेत. यासाठी त्या स्वतः खूप उत्सुक आहेत. नवीन मालिकेतून नक्कीच काही तरी वेगळ्या शैलीची भूमिका त्या साकारणार आहेत यात शंका नाही. आगामी मालिकेविषयी सांगताना त्यांनी काही खास गोष्टी सांगितल्या आहेत.

आजवरच्या सर्व दैवी भूमिका केवळ व्यावसायिकता म्हणून नाही तर श्रद्धा ठेवून केल्याचे त्या सांगतात. त्यांच्या मते ‘एखाद्या देवाची भूमिका आपण साकारतो तेव्हा आपल्यातही ऊर्जा येत असते. शिवाय लोकांचे श्रद्धास्थान असल्याने जबाबदारीही असते. त्या देवाचे माहात्म्य, अनुभव या सगळ्याचा अभ्यास करून अशा भूमिका साकाराव्या लागतात. त्याशिवाय लोक त्या पात्राशी एकरूप होत नाहीत.’ ‘काळूबाईच्या नावानं चांगभलं’ हा सिनेमा फार वर्षांपूर्वी केला होता. तेव्हाच त्या देवीची महती आणि प्रचीती मी अनुभवली होती आणि यावर मालिका करावी असा विचार मनात येऊन गेला होता. आज इतक्या वर्षांनी तो पूर्णत्वास आल्याने मी या भूमिकेला चटकन होकार दिला. मुळात ही सामान्य माणसांची देवी आहे. हिचा शृंगार भपकेदार नाही. प्रत्येकाला आपली वाटेल अशी ही देवी आहे. त्यात मालिकेचे विशेष म्हणजे यात केवळ देवीची महती नाही तर सामाजिक भान आणि देवीची साथ अशी सांगड घालण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

नव्या पिढीला मार्गदर्शन करताना त्यांचे कौतुकही त्या करतात. ‘केदार शिंदे, सलील कुलकर्णी, समीर विद्वांस, क्षितिज पटवर्धन, सोनाली कुलकर्णी, सई ताम्हणकर अशा नव्या मुलांच्या मी संपर्कात आले. या पिढीकडे प्रचंड ऊर्जा आहे. याच पिढीने मला वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका दिल्या. ‘श्रीमंत दामोदर पंत’, ‘वेडिंगचा शिनेमा’, ‘धुरळा’सारखे चित्रपट करण्याची संधी मिळाली. त्यांच्याबरोबरचे मित्रत्वाचे नाते मला आवडते. मी भूमिका जरी सोशीक आणि रडवेल्या केल्या असल्या तरी वैयक्तिक आयुष्यात मात्र आनंदी आणि नव्या पिढीसोबत चालण्याचा माझा प्रयत्न असतो. किंबहुना मी त्यांच्याकडून नव्या गोष्टी आत्मसात करत असते. म्हणून लेखक-दिग्दर्शक वयाने कितीही लहान असले तरी त्यांचा आदर करत मी काम करते, असं त्या सांगतात.

नव्या मालिकेसाठी उत्सुक
काळूबाई या दैवताशी अनेक गैरसमज, अंधश्रद्धा जोडल्या गेल्या आहेत. ते गैरसमज दूर करण्यासाठी या मालिकेची निर्मिती करण्यात आली आहे. मालिकेचे लेखन शिरीष लाटकर यांनी केले असून सातारा जिल्ह्यात चित्रीकरण सुरू आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आशालता, प्राजक्ता गायकवाड, शरद पोंक्षे, मिलिंद शिंदे, प्रसन्न धुपकर, मंजूषा गोडसे अशा दर्जेदार कलाकारांची जत्रा यात पाहायला मिळणार आहे.

दर्जेदार चित्रपट आणि आता ही वेगळ्या धाटणीची मालिका लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. आजवर मराठी सिनेसृष्टीत त्यांनी मोलाचं योगदान दिलंय आणि आता लवकरच छोट्या पडद्यावर ही अनोखी मालिका त्या आपल्या भेटीला घेऊन येणार आहेत. कौटुंबिक भूमिका आणि आणि दैवी भूमिकेतून त्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. एक उत्तम निर्माती म्हणून त्यांनी काम केलंय आणि आता पुन्हा अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकून घेण्यासाठी त्या सज्ज झाल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER