मुख्यमंत्र्यांनी आवाहन करताच शिवाजी महाराजांच्या रायगडावरून रणरागिणीचा तत्काळ प्रतिसाद

CM Uddhav Thackeray

मुंबई : राज्यात विशेषतः मुंबईत कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या जनतेशी फेसबुकद्वारे संवाद साधला. तसेच या कोरोना व्हायरसच्या  संकटात निवृत्त वैद्यकीय कर्मचारी, ज्यांनी सैन्यातील आरोग्य विभागात काम केले आहे किंवा जे डॉक्टर्स, परिचारिका किंवा वॉर्डबॉय निवृत्त झाले आहेत त्यांनी आमच्यासाठी संपर्क साधावा आणि या युद्धात साथ द्यावी, असे आवाहन ठाकरे यांनी काही वेळेपूर्वीच केले होते.

वैद्यकीय प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तींना ‘कोरोना’विरुद्धच्या युद्धात सामील होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रथम प्रतिसाद शिवाजी महाराजांची कर्मभूमी असलेल्या रायगडावरील एका रणरागिणीने दिला आहे. ‘माझं नर्सिंगचं प्रशिक्षण झालं आहे. ‘ असा तत्काळ प्रतिसाद देत रायगडच्या रणरागिणीने नर्स म्हणून देशसेवा करण्याची तयारी दर्शवली आहे.

रायगड जिल्ह्यात अलिबागमधील चोंढी तालुक्यात राहणाऱ्या शुभ्रा संदेश जाधव यांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला तत्काळ प्रतिसाद दिला आहे. ‘माझे नर्सिंग प्रशिक्षण पूर्ण झाले असून लग्नानंतर सध्या घरीच आहे. मुख्यमंत्र्यांनी देशसेवा करण्यासाठी केलेल्या आवाहनानुसार आपण अलिबाग तालुक्यात नर्स म्हणून काम करण्यास तयार आहोत. ’ अशा आशयाचा ई-मेल त्यांनी पाठवला आहे. नर्सिंग सर्टिफिकेटही त्यांनी या मेलमध्ये जोडले आहे.