रणबीरला कोरोना झाल्याने आलियाच्या वाढदिवसाची पार्टी झाली रद्द

रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) हे बॉलिवूडमधील सध्याचे सगळ्यात चर्चेत असलेले प्रेमी जोडपे आहे. कोरोना काळातही हे दोघे सतत एकत्र दिसत होते. या दोघांनी ब्रह्मास्त्रचे शूटिंगही एकत्र केले होते. पण दोन-तीन दिवसांपूर्वी रणबीर कपूरला कोरोनाची लागण झाल्याचे समोर येतात आलिया घाबरली होती. कोरोना काळात आलिया वरचेवर तिची कोरोना चाचणी करीत आली होती आणि करीत आहे. रणबीरला कोरोना झाला असला तरी आलिया मात्र निगेटिव्ह आहे. याची बातमी आम्ही तुम्हाला दिलीच होती. आलियाचा पुढील आठवड्यात वाढदिवस असून रणबीरला कोरोना झाल्यामुळे आलियाने वाढदिवसाची पार्टी रद्द केल्याचे सांगितले जात आहे. रणबीरला कोरोना झाल्याची माहिती त्याची आई नीतू कपूर यांनीच दिली होती.

१५ मार्चला आलियाचा वाढदिवस आहे. प्रत्येक वर्षी आलिया तिच्या वाढदिवसानिमित्त एका भव्य पार्टीचे आयोजन करते. या पार्टीला बॉलिवूडमधील सगळे मोठे कलाकार, निर्माता दिग्दर्शक उपस्थित असतात. गेल्या वर्षी कोरोनाची लागण नुकतीच सुरु झाली होती. तरीही आलियाने वाढदिवसाची पार्टी केली होती. कोरोनाचे संकट अजून संपलेले नसले तरी रणबीर कपूरने त्याच्या गर्लफ्रेंडच्या वाढदिवसानिमित्त एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीचे निमंत्रण अगोदरच सगळ्यांना देण्यात आले होते. कोरोना नियमांचे पालन करून पार्टी केली जाणार असल्याचे सांगितले जात होते. पण आता आलियाने ही पार्टी रद्द केल्याचे सांगितले जात आहे.

रणबीर कपूरसह गंगुबाई काठियावाड सिनेमाचा निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भंसाळीलाही कोरोनाची लागण झाल्याने आलियाने तिची कोरोना टेस्ट निगेटिव्ह असली तरी स्वतःच क्वारंटाईन राहाण्याचा निर्णय घेतला आहे. आलिया १४ दिवस क्वारंटाईन राहाणार असल्याने ती कोणालाही भेटणार नाही. त्यामुळे पार्टी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. रणबीरचा कोरोना बरा झाल्यानंतर आलियाची वाढदिवसाची पार्टी केली जाणार असल्याचे आलियाच्या एका मित्राने सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER