
पूर्वीच्या काळी नायक किंवा नायिका सिने निर्मिती करण्याच्या भानगडीत पडत नसत. मात्र स्वःताचा मुलगा किंवा मुलगी असेल तर तिला लाँच करण्यासाठी काही नायक-नायिकांनी निर्मितीच्या क्षेत्रात उतरून सिनेमे तयार केले आहेत. यात अगदी शोभना समर्थ ते हेमा मालिनीपर्यंत आणि राज कपूरपासून धर्मेंद्र, विनोद खन्नापर्यंत काही नावे पटकन घेता येतील. मात्र नव्या पिढीतील नायक-नायिकांनी सिनेमात काम करता-करताच याचे भवितव्य लक्षात घेऊन सिने निर्मितीत पाऊल टाकले आणि यशही मिळवले आहे. माधुरी दीक्षित, प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा यांनी सिने निर्मितीला सुरुवात केलेली आहे. या यादीत आता आलिया भट्टचेही (Alia Bhatt) नाव जो़डले गेले आहे.
आलिया भट्टच्या वडिलांचा महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांचा ‘विशेष फिल्म्स’ हा बॅनर आहे. या बॅनरअंतर्गत त्यांनी अनेक सिनेमे केले आहेत. पण आलियाने वडिलांच्या बॅनरअंतर्गत सिनेमा तयार करण्याऐवजी स्वतःचे बॅनर स्थापन करून सिने निर्मिती करण्याचा विचार केला आहे. आलियाने तिच्या कंपनीचे नाव ‘इटरनल सनशाईन’ असे ठेवले असून ती तिचा पहिला सिनेमा शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) ‘रेड चिली एंटरटेनमेंट’ कंपनीसोबत तयार करणार आहे. आलियाने शाहरुख द्वारा निर्मित ‘डार्लिंग्स’ सिनेमात काम करण्यास होकार दिल्याची माहिती काही दिवसांपूर्वी आम्ही तुम्हाला दिलीच होता. आलियाने याच सिनेमाच्या माध्यमातून निर्मितीच्या क्षेत्रात पाऊल ठेवण्याचे ठरवले आहे.
‘डार्लिंग्स’ हा मुंबईत राहाणाऱ्या एका मध्यमवर्गिय कुटुंबाची कथा सांगणारा सिनेमा आहे. यात एका आई आणि मुलीची कथा सादर करण्यात येत असून आईची भूमिका शेफाली शाह आणि मुलीची भूमिका आलिया भट्ट साकारणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्सन जसमीत के रीन करीत आहे. जसमीत लेखिका असून यापूर्वी तिने ‘फोर्स 2’, ‘फन्ने खान’ आणि ‘पति पत्नी और वह’ या सिनेमांचे लिखाण केलेले आहे. तसेच काही मोठ्या दिग्दर्शकांसोबत तिने सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केलेले आहे. शाहरुख खानची कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंटचा सीईओ गौरव वर्मा, शाहरुख खानची पत्नी गौरी खान आणि आलिया भट्ट मिळून या सिनेमाची निर्मिती करणार आहेत. संजय लीला भंसाळीच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ सिनेमाचे काम पूर्ण झाल्यानंतर आलिया या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.
ही बातमी पण वाचा : तीन वर्षांपासून रखडलेले मराठी सिनेमांचे अनुदान मिळावे म्हणून ‘इम्पा’ने पाठवले सरकारला पत्र
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला