अलीम दार यांचा पंचगिरीचा नवा विक्रम

Aleem Dar set to creat new umpiring record

पाकिस्तानी (Pakistan) क्रिकेट पंच (Cricket Umpire) अलीम दार (Aleem Dar) हे आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंचगिरीचा नवा विक्रम रविवार, 1 रोजी करणार आहेत. ते वन डे इंटरनॅशनलचे सर्वाधिक सामने पंचगिरी करणारे पंच ठरणार आहेत. पाकिस्तान आणि झिम्बाब्वेदरम्यानचा रावळपिंडी येथील सामना हा त्यांचा 210 वा वन डे सामना असेल. यासह दक्षिण आफ्रिकन पंच रुडी कोएत्झन यांना ते मागे टाकतील.

वन डेचे 209 सामने धरुन 52 वर्षीय दार यांनी आतापर्यंत सर्वाधिक 387 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंचाची भूमिका पार पाडली आहे. कसोटी सामन्यांमध्येही सर्वाधिक 132 सामन्यांचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. यात त्यांनी वेस्ट इंडिजच्या स्टिव्ह बुकनाॕर यांना मागे टाकले आहे. बुकनाॕर हे 128 कसोटी सामन्यांमध्ये पंच होते. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या बाबतीत मात्र ते दुसऱ्या स्थानी आहेत.त्यांनी 46 टी-20 सामन्यात पंचाची जबाबदारी पार पाडली आहे. मात्र पाकिस्तानचेच एहसान रझा हे त्यांच्यापुढे आहेत. रझा यांनी 49 टी-20 इंटरनॅशनलमध्ये पंचगिरी केली आहे.

या विक्रमी टप्प्यांबद्दल दार म्हणतात की सर्वाधिक कसोटी व वन डे सामन्यांमध्ये पंच असणे ही माझ्यासाठी मोठी सन्मानाची बाब आहे. मी सुरुवात केली तेंव्हा आपण हा टप्पा गाठू असे मला वाटले नव्हते. मैदानावरील प्रत्येक क्षणाचा आनंद मी घेत आलोय आणि खूप काही शिकत आलोय. शिकण्याची प्रक्रिया अखंड सुरु आहे.

दार हे स्वतः प्रथम श्रेणीचे 17 सामने लेगस्पिनर म्हणून खेळले आहेत. मर्यादीत षटकांचे 18 सामनेसुध्दा त्यांच्या नावावर आहे. 1997-98 मध्ये 11 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीला त्यांनी रामराम ठोकला आणि फेब्रुवारी 2000 मध्ये श्रीलंकेविरुध्दच्या गूजरानवाला वन डे सामन्यात ते पहिल्यांदा पंच म्हणून उतरले.,गेल्या 16 वर्षांपासून ते आयसीसीच्या पंचाच्या पॕनलमध्ये आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER