17 वर्ष आणि 132 कसोटीनंतर ‘ह्या पंचाचा’ मायदेशी पहिलाच सामना

Aleem dar finally gets match at home

तब्बल 17 वर्षांची कारकिर्द आणि 132 कसोटी सामने…एवढ्या काळातही कुणाचा मायदेशी एकही सामना नसेल तर आश्चर्य तर वाटेलच! पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एखाद्या पंचाबाबतचा हा इतिहास आहे असे समजेल तेंव्हा आश्चर्य वाटणार नाही. धन्यवाद कोरोनाला (Corona) …आता ही मालिका खंडीत झाली आहे. 17 वर्ष आणि 132 कसोटी सामन्यानंतर आता पाकिस्तानी (pakistan) पंच (Umpire) अलीम दार (Aleem Dar) पहिल्यांदाच मायदेशातील कसोटी सामन्यात पंच आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या (South Africa) कराची (Karachi) कसोटीत त्यांना ही संधी मिळाली आहे. नाही म्हणायला मध्यंतरी पाकिस्तानातील दोन कसोटींसाठी अलीम दार पंच होते पण मैदानात नाही तर ते टेलिव्हिजन पंच होते.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 2002 पासून सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दोन्ही पंच तटस्थ असतील असा निर्णय घेतल्याने, शिवाय 2009 मध्ये श्रीलंकन संघावर झालेल्या हल्ल्यापासून पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय क्रिकेट बंद झाल्याने अलीम दार यांना ही संधी मिळाली नव्हती. सन 2000 मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पंच म्हणून पदार्पण केले आणि 2004 मध्ये ते आयसीसीच्या पंचाच्या पॕनलमध्ये आले. सर्वाधिक कसोटी सामने आणि सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने (391) त्यांच्या नावावर आहेत पण आत्तासुध्दा कोरोनामुळे पंचांच्या प्रवासावर बंधने नसती तर अलीम दार यांना ही संधी मिळाली नसती पण कोरोनाने ती संधी दिली आणि 133 वा कसोटी सामना हा त्यांचा पंच म्हणून मायदेशातील पहिला कसोटी सामना आहे. त्यांच्यासोबत एहसान रझा हे दुसरे पंच आहेत.

दार हे स्वतः लेगस्पिनर होते त्यांनी 17 प्रथमश्रेणी आणि 18 लिस्ट ए सामने खेळलेले आहेत.

एवढ्या प्रदीर्घ कालखंडात मायदेशातील पहिलाच कसोटी सामना पंच म्हणून करायला मिळत असला तरी हा माझ्यासाठी फार मोठा सन्मान आहे. ही फार मोठी संधी आहे. आपण एवढा पल्ला गाठला याचा मला अभिमान आहे. कोणत्याही देशाच्या पंचासाठी ही सोपी गोष्ट नाही असे अलीम दार यांनी म्हटले आहे.

खेळाडूंप्रमाणेच पंचांनासुध्दा मायदेशी जबाबदारी पार पाडायची इच्छा असते. मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये मी ते केलेय, पण कसोटी क्रिकेट सर्वोच्च असते आणि जगातील दोन उत्तम संघांसाठी पहिल्या दोन सामन्यात मी पंच म्हणून उभा राहाणार असल्याचा आनंद आहे. माझ्या कामावर माझे प्रेम आहे आणि अजुनही ते करताना मला आनंद येतो. मी माझे काम आतापर्यंत योग्यरित्या आणि प्रामाणिकपणे केले आहे. ज्या दिवशी मला वाटेल की मी योग्य काम करु शकत नाही त्यादिवशी मी हे काम सोडून देईन.काहीवेळा निर्णय चुकीचे होत असतात पण ज्या दिवशी निर्णय चुकताहेत असे मला वाटेल आणि आपण जे बघतोय त्याबद्दल मला विश्वास वाटू लागणार नाही मी निवृत्ती घेईन असे दार यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER