औरंगाबाद : शहरात ऑनलाईन, तर ग्रामीण भागात उद्यापासून मद्यविक्री

Aurangabad Liquor Sales
  • नियमांचे पालन न झाल्यास परवानगी परत घेण्यासंदर्भात होणार विचार
  • सायंकाळी ७ वाजेनंतर संचारबंदीची शक्यता

औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने केंद्राने ३० जूनपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राची नवीन नियमावली जाहीर झाली असून याचा अभ्यास केल्यानंतर राज्य सरकार ३१ मे रोजी गाइडलाइन जारी करू शकते. जिल्हा प्रशासनालाही याची प्रतीक्षा आहे. मात्र १ जूनपासून जिल्ह्यात मद्यविक्रीचा मार्ग मोकळा झाला आहे. ग्रामीण भागात मद्यविक्रीची मुभा असून शहरी भागात घरपोच मद्य मिळणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी एका वर्तमानप्रत्राशी बोलताना दिली. दरम्यान, शहरात इतर बाजारपेठ सकाळी सुरू आणि सायंकाळनंतर संचारबंदीच्या पर्यायावर प्रशासकीय पातळीवर चर्चा सुरू आहे.

१ तारखेपासून मद्य विक्रीची मुभा आहे. याबाबत बोलताना चौधरी म्हणाले की, ग्रामीण भागात १ जूनपासून बिअर बार उघडणार आहेत. शहरात दारू ही ऑनलाइन मिळणार आहे. वाइन शॉप मालकांच्या माध्यमातूनच घरपोच मद्यविक्री करावी लागणार आहे. त्यासाठी मनुष्यबळ तयार आहे. शहरात फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडू नये या भीतीपोटी दारूची दुकाने सुरू न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण यापुढे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न झाल्यास पुन्हा ही परवानगी काढून घेण्याचा विचार होऊ शकतो, असेही ते म्हणाले.

सायंकाळी सात वाजेनंतर संचारबंदीची शक्यता : शहरात सध्या सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत दुकाने उघडी आहेत. मात्र प्रशासकीय पातळीवर सर्व दुकानांना उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. सकाळी सात ते पाच अथवा सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत दुकाने उघडे ठेवण्यावर विचार सुरू आहे. संध्याकाळी सातनंतर पुन्हा संचारबंदी अशा प्रकारची चर्चा प्रशासकीय पातळीवर होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच शहरातील अर्ध्या भागात सर्व दुकाने एक दिवस सुरू करायची तर अर्ध्या भागात दुसरी दुकाने सुरू ठेवण्याबाबतही चर्चा केली जात आहे. वास्तविक पाहता प्रशासकीय पातळीवर अजून कुठलाही निर्णय झालेला नाही. मात्र नव्या लॉकडाऊनमध्ये आणखी सूट मिळण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांनीदेखील सर्व दुकाने उघडी ठेवण्याची मागणी अगोदरच केली आहे. नियमात शिथिलता देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या फेसबुक लाइव्हमध्ये अनेक प्रश्न विचारले गेले होते. शिवाय व्यापारी, सर्वसामान्य जनतेमध्ये केव्हा एकदा लॉकडाऊन उघडते याची प्रतीक्षा सुरू आहे. सध्या इलेक्ट्रॉनिक, कपडा मार्केट अजूनही सुरू झालेले नाही. त्यामुळे यांच्यासह सर्व व्यापारीदेखील सूट मिळण्यासाठी प्रतीक्षेत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER