अक्षयचा ‘सूर्यवंशी’ पुन्हा पुढे ढकलला, ओटीटीवर रिलीज होण्याची शक्यता

Akshays Suryavanshi postponed again

रोहित शेट्टीने (Rohit Shetty) त्याच्या इन्स्पेक्टर फ्रेंचाईजीमध्ये अक्षयकुमारची वर्णी लावत सूर्यवंशी सिनेमाची निर्मिती केली. या सिनेमासाठी प्रचंड खर्चही करण्यात आला. अक्षयकुमारची (Akshay Kumar) अॅक्शन हीरोची असलेली इमेज आणि अॅक्शनसाठी विख्यात असलेला रोहित शेट्टी या सिनेमासाठी एकत्र आले आणि सिनेमात अॅक्शनचा धडाका केला. पण कोरोनाचे संकट आले आणि गेल्या वर्षी रिलीज होणारा हा सिनेमा रिलीजच होऊ शकला नाही. आता 2 एप्रिल रोजी सिनेमा रिलीज करण्याचा विचार सिनेमाची निर्मिती करणाऱ्या कंपनी रिलायन्सने (Reliance Entertainment) घेतला. पण अक्षयकुमारच्या या सिनेमामागचे शुक्लकाष्ठ काही संपलेले दिसत नाही. आता हा सिनेमा काही कारणास्तव 2 एप्रिलला रिलीज न करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. एवढेच नव्हे तर हा सिनेमा थेट ओटीटीवर रिलीज करण्याचा विचारही सुरु करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

कोरोनामुळे अक्षयपुढे मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्याने सिनेमे तर फटाफट पूर्ण केले पण त्यांना बॉक्स ऑफिसची डेट मिळत नसल्याने रिलीजची समस्या उद्भवली आहे. कोरोना काळात त्याने त्याचा लक्ष्मी सिनेमा ओटीटीवर रिलीज केला. पण हा सिनेमा प्रेक्षकांनी अक्षरशः धुडकावून लावला. ‘सूर्यवंशी’ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्याने बॉलिवूडमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सिनेमा पूर्ण होऊन एक वर्षापेक्षा जास्त काळ झालेला असल्याने प्रेक्षकांचा या सिनेमाबाबत उत्साह कमी झाला असे निर्मात्यांना वाटत आहे. त्यामुळेच सिनेमाचे रिलीज पुढे ढकलण्यात आले असे सांगितले जात आहे. मात्र या निर्णयामुळे बॉलिवूडमध्येही चिंतेचे वातावरण आहे. जर अक्षयकुमारला त्याच्या सिनेमाबाबत खात्री नसेल तर दुसऱ्यांच्या सिनेमाचे काय होणार असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

सिनेमाचे रिलीज पुढे ढकलत राहिल्याने रिलायन्स एंटरटेनमेंटला प्रत्येक महिन्याला मोठ्या रकमेचे नुकसान सोसावे लागत आहे. त्यातच थिएटर मालकांनीही सिनेमा रिलीज करतो पण व्यवसायात जास्त हिस्सा मागितल्यानेही रिलायन्सपुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळेच सिनेमाचे रिलीज पुढे ढकलण्यात आले असून आता हा सिनेमा थिएटरऐवजी ओटीटीवर रिलीज करण्याचा विचार रिलायन्सने सुरु केला आहे. पण हा सिनेमा ओटीटीवर रिलीज करण्यास रोहित शेट्टी तयार नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ‘सूर्यवंशीे’चे काय होणार असा प्रश्न सगळे विचारू लागले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER