अक्षयचे आता ‘मिशन लायन’

Jagan Shakti - Akshay Kumar

भारताने मंगळावर स्वारी केल्यानंतर याच विषयावर दिग्दर्शक जगन शक्तीने अक्षय कुमार (Akshay Kumar), विद्या बालन (Vidya Balan), सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) यांना घेऊन ‘मिशन मंगल’ सिनेमा प्रेक्षकांसमोर आणला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रचंड चालला होता. भारताच्या या अनोख्या मोहिमेचे प्रेक्षकांनी मनापासून स्वागत केले होते. तांत्रिकदृष्ट्या सिनेमा हॉलिवुडच्या तोडीचा नसला तरी त्यातील अपील आणि या मोहिमेत असलेला महिलांचा सहभाग प्रक्षकांनी डोक्यावर घेतला होता. याच जगन शक्तीबरोबर अक्षयकुमार आणखी एक सिनेमा करणार असल्याची गेल्या काही महिन्यांपासून चर्चा होती. मात्र या दोघांनीही त्याबाबत काहीही सांगितले नव्हते. मात्र आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जगन शक्ती आणि अक्षयकुमार एकत्र येत असून ‘मिशन मंगल’च्या धर्तीवर ‘मिशन लायन’ चित्रपट सुरु करणार आहेत. हा सिनेमा सायंंस फिक्शन असणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमात अक्षय कुमार दुहेरी भूमिका साकारणार असल्याचे सांगितले जात आहे.

अक्षयकुमार सध्या बॉलिवुडमध्ये सगळ्यात जास्त मागणी असलेला कलाकार आहे. याचे कारण म्हणजे तो जे चित्रपट करतो ते सगळे बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरतात. बऱ्याच काळानंतर त्याचा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला लक्ष्मी सुपरफ्लॉप झाला आहे. अक्षयकडे सध्या आठ ते दहा मोठे सिनेमे आहे. त्यापैकी ‘सूर्यवंशी’ तयार असून पुढील वर्षी जानेवारीमध्ये तो सिनेमा प्रदर्शित केला जाऊ शकेल. त्यानंतर अक्षयचे ‘बच्‍चन पांडे’, ‘बेल बॉटम’, ‘पृथ्‍वीराज’, ‘रक्षा बंधन’, ‘अतरंगी रे’ प्रदर्शित होतील. साजिद नाडियाडवालानेही नुकतीच हाऊसफुल 5 ची घोषणाही केली आहे ज्यात अक्षयकुमार पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे.

आणि आता अक्षयने ‘मिशन लायन’चे काम सुरु करण्यास होकार दिला आहे. या सिनेमाच्या कथेवर गेल्या अनेक महिन्यांपासून काम सुरु होते. अक्षयला डोळ्यासमोर ठेऊनच कथा लिहिण्यात आली आहे. यातील अक्षयची भूमिका खूपच आव्हानात्मक असेल असे सांगितले जात आहे. अक्षय सध्या त्याच्या अन्य सिनेमांमध्ये बिझी असल्याने पुढील वर्षी मार्च-एप्रिलमध्ये या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली जाऊ शकते असे म्हटले जात आहे. या सिनेमात मोठ्या प्रमाणावर एफएक्स (स्पेशल इफेक्ट्स)चा वापर केला जाणार आहे. सिनेमात अक्षयसोबत काम करण्यासाठी कलाकारांची निवड लवकरच केली जाणार आहे अशी माहितीही सूत्रांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER