सिक्रेट व्हिडिओ बनवण्यात अक्षया मास्टर

Akshaya Naik

एखादी मालिका सुरू झाली की त्या मालिकेतील कलाकार दिवसाचे १६ ते १८ तास शूटिंगच्या निमित्ताने सेटवर एकत्र असतात. मालिकेतील कुटुंब हे त्यांचे दुसरे घरच बनलेले असते. म्हणूनच जेव्हा मालिकेतील कुणा कलाकाराचा ट्रॅक संपला की सेटवर इमोशनल वातावरण तयार होत असतं. कुणाची तब्येत बिघडली तर सारा सेटच्या कानाकोपरा काळजी पडतो. जसं चिंता करण्याच्या वेळी काळजी वाटते, ट्रॅक संपला की त्याला मिस करण्याच्या विचाराने अस्वस्थ व्हायला होतं तसच मालिकेच्या सेटवर थोडा जरी रिकामा वेळ मिळाला की धमाल, मजामस्तीही सुरू असते. अशा धमाल मस्तीचे अनेक किस्से कलाकार चाहत्यांशी नेहमीच शेअर करत असतात. सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतील लतिका अर्थात अक्षया नाईकलाही (Akshaya Naik) सहकलाकारांचे व्हिडिओ बनवायला खूप आवडते. पण हे व्हिडिओ असे काही मजेशीर असतात आणि आपला व्हिडिओ शूट केला जातोय हे त्यांना कळणारही नाही इतक्या शिताफीने अक्षया तिच्या मोबाइलला कामाला लावते. मग काय, सध्या अक्षयाकडे मालिकेतील प्रत्येक सहकलाकाराचे इतके सिक्रेट व्हिडिओ आहेत की त्यावर अक्षया म्हणते, मला कंटाळा आला तर व्हिडिओ दाखवून मी त्यांच्याकडून माझे कोणतेही काम करून घेऊ शकेन. अर्थात अक्षया सगळ्यांची फिरकी घेते आणि शूटिंगमुळे आलेला कंटाळा पळवून लावण्यासाठी अक्षयाच्या मोबाइलची व्हिडिओगॅलरी उघडली जाते.

सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत सध्या रंजक वळण आले आहे. लतिकाच्या लग्नामुळे ऑनस्क्रीनजरी टेन्शनचे वातावरण असले तरी ऑफस्क्रिन एकमेकांच्या खोड्या काढणे, सेल्फी काढणे, गाणी म्हणणे अशी मजा सुरू असते. अक्षयाची भूमिका जरी समजूतदार मुलीची असली तरी ती प्रत्यक्षात खूपच खोडकर आहे. याचा अनुभव मालिकेच्या सेटवरील तिचे सगळेच सहकलाकार घेत असतात. दोन शॉटच्या मध्ये रिकामा वेळ मिळाला की अक्षया तिच्या मोबाइलमध्ये दंग होते. सगळ्यांना वाटतं की तिचं चॅटिंग सुरू असेल. किंवा ती सोशल मीडियावरील पोस्ट वाचत असेल. स्वत: काही पोस्ट अपडेट करत असेल. पण इथेच सगळ्यांचा अंदाच सपशेल चुकतो आणि कुणाला कळतच नाही की तिने तिच्या मोबाइल कॅमेरा ऑन करून अँगल लावलेला असतो. मग काय, कुणी डुलका काढत असतो, तर कुणी कसाही पाय पसरून खुर्चीवर बसलेला असतो. कुणी लंचसाठी आणलेल्या जेवणाच्या डब्यात काय आहे हे इतरांच्या नजरा चुकवून बघत असतो. अक्षयाच्या सिक्रेट व्हिडिओमध्ये हेच शूट होत असतं आणि मग तिला जेव्हा त्या कलाकाराकडून काही काम करून घ्यायचं असेल तेव्हा त्याला व्हिडिओ दाखवून आरामात काम करून घेतले. पण अक्षया करत असलेली ही मजा सर्वांनाच आवडत असल्याने आता ती कुणाला व्हिडिओत पकडणार याची चर्चा सेटवर सुरू असते.

वैशिष्ट्य म्हणजे अक्षया वास्तवातही वजनाने जाड आहे. मालिकेतील भूमिकेसाठी वजन वाढवलेली नायिका म्हणून ती पडद्यावर दाखवण्यात आली नसून खऱ्या आयुष्यातही तिने शरीराच्या जाडीवरून एकाद्या व्यक्तीच्या गुणांकडे डोळेझाक कशी होते याचे छोटेमोठे अनुभव तिनेही घेतले आहेत. त्यामुळेच या मालिकेतून अक्षया खऱ्या अर्थाने सौंदर्याची व्याख्या सांगत असून यानिमित्ताने जाड मुलींकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला तर माझ्या भूमिकेचे सार्थक होईल असे अक्षयाला वाटतेय.

अक्षयाचा प्रवास या मालिकेच्या निमित्ताने हिंदीकडून मराठीकडे होणार आहे. खरंतर मराठी कलाकार हिंदीतील चांगल्या संधीच्या शोधात असतात पण अक्षया हिंदी मालिकांमध्ये स्थिरावली असतानाही तिने सुंदरा अर्थात पडद्यावरची लतिका साकारण्यासाठी होकार दिला कारण तिला जाड मुलींकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलायचा आहे. जाडीवरून शाळकरीवयात, कॉलेजच्या मोरपंखी दिवसात आणि पुढे लग्न ठरवताना मुलींना खूप टोमणे ऐकून घ्यावे लागतात. या विचारसरणीत बदल व्हायचा असेल तर मुलांनी, त्यांच्या कुटुंबियांनी लग्नासाठी मुली शोधताना अपेक्षांच्या यादीतील, मुलगी सडपातळ असावी ही ओळ काढून टाकावी असंही अक्षया सांगते.

अक्षया ही मुंबईची असून तिला लहानपणापासून अभिनयाची आवड आहे. वयाच्या आठव्या वर्षी अकल्पित या मराठी सिनेमात अक्षयाने काम केले होते. तर ये रिश्ता क्या कहलाता है या लोकप्रिय मालिकेतील अनन्याच्या भूमिकेत अक्षया दिसली आहे. लावणी, लोकनृत्यात पारंगत असलेल्या अक्षयाने मयूर वैद्य यांच्याकडे नृत्याचे धडे गिरवले असून अभिनयासोबत अनेक जाहिराती व व्हॉइस ओव्हर कलाकार म्हणूनही अक्षयाचे करिअर सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER