फ्लॅशबॅक : हम है सीधे सादे अक्षय

Akshay Kumar

एंट्रो – १९९६ मध्ये अक्षयकुमारचा खिलाड़ियों का खिलाड़ी चित्रपट आला होता. या चित्रपटात एक गाणे होते जय माता के भक्त हैं,वादो के सख्त हैं, आकाश से हम आए, तन मन के हम हैं सच्चे, मरती हैं हम पे लडकियां, बूढ़े और बच्चे, अरे ना हम अमिताभ, न दिलीप कुमार, ना किसी हीरो के बच्चे, हम हैं सीधे सादे अक्षय, हम हैं सीधे सादे अक्षय हे गाणे म्हणजे राजीव भाटिया उर्फ अक्षयकुमारच्या जीवनाचे वर्णन करणारे अत्यंत योग्य असे गीत आहे.

बॉलीवुडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे समाजाप्रती आपलेही काही कर्तव्य आहे असे मानतात आणि शक्य तेवढी मदत गरीबांना करीत असतात. यात अक्षयकुमार सोबतच अमिताभ बच्चन जॅकी श्रॉफ, जॉनी लिव्हर, अजय देवगन, सलमान खान इत्यादी कलाकारांचा समावेश आहे. समाजाला मदत करताना त्याची वाच्यताही यापैकी काही कलाकार करीत नाहीत. आता कोरोनाच्या संकटात अक्षयकुमार ने केंद्र, राज्य सरकारसोबतच अनेक चित्रपट कर्मचारी संघटनांना भरघोस मदत केली आहे. गेल्या काही वर्षांपासून मी अक्षयला नेहमी भेटत आलो आहे आणि अनेकदा त्याची मुलाखत घेतल्याने तो खरोखरच या गीताप्रमाणे आहे हे जाणवले आहे.

अक्षयची पहिली भेट वांद्रे येथील महबूब स्टुडियोमध्ये झाली होती. पहिल्या भेटीतच अक्षय खूप मोठी प्रगती करेल असा का कोण जाणे मनात आले आणि आज अक्षयला पाहाताना ते किती खरे होते ते जाणवते. घराण्यात कोणीही चित्रपट क्षेत्रात नसतानाही केवळ आपल्या इच्छाशक्तीच्या आणि मेहनतीच्या बळावर आज अक्षयकुमार बॉलीवुडमध्ये खानांना टक्कर देऊन उभा आहे. यूनिसेफमध्ये काम करीत असलेल्या हरीओम भाटिया यांच्या पोटी राजीवचा नवी दिल्ली येथे ९ सप्टेंबर १९६७ रोजी जन्म झाला. जन्मानंतर दोनच वर्षात त्याच्या वडिलांची मुंबईला बदली झाल्याने तो मुंबईला सायन कोळीवाडा येथे राहू लागला. डॉन बॉस्को स्कूलमध्ये शिकलेल्या राजीवला त्याच्या एका कराटे शिकणा-या मित्रामुळे कराटेची आवड लागली आणि गोजुकाईमध्या त्याने प्राविण्य मिळवले. दहावीनंतर त्याला शिकण्याची इच्छा नसल्याने त्याने कराटेमध्ये करिअर करण्याचे ठरवले आणि आईवडिलांची परवानगी घेऊन बँकॉकला गेला. तेथे हॉटेलमध्ये काम करू लागला आणि काही वर्ष त्याने हॉटेलमध्ये येणा-या पर्यटकांसाठी गाईडचेही काम केले आणि असे काम करीत त्याने सहा वर्ष कराटेचे प्रशिक्षण पूर्ण केले.

मुंबईला आल्यानंतर त्याने मुलांना कराटे शिकवण्याचे क्लासेस सुरु केले. याच दरम्यान त्याच्या एका विद्यार्थ्याच्या वडिलांनी मॉडेलिंगबाबत विचारले. ते एका जाहिरात एजंसीत मॉडेल कोऑर्डिनेटर होते. तेव्हा अक्षयने पहिला प्रश्न विचारला होता पैसे किती मिळतील? साडे तीन हजार रुपये आणि तेसुद्धा एका दिवसात मिळणार असे ऐकताच तो लगेच तयार झाला कारण मुलांच्या फीपोटी त्याला महिन्याला चार हजार रुपये मिळत होते. त्याची पहिली जाहिरात होती नॉवेल्टी फर्निशिंग शोरूमसाठी. त्यानंतर आणखी चार-पाच काही जाहिराती केल्या, फॅशन शो केले आणि चित्रपटात काम मिळवण्यासाठी त्याने निर्मात्यांचे उंबरठे झिजवण्यास सुरुवात केली. त्याला पहिले काम मिळवण्यात यश मिळाले प्रमोद चक्रवर्ती यांच्या दीदार चित्रपटात. तेसुद्धा कॅमेरामनमुळे, नटराज स्टुडियोमध्ये प्रमोद चक्रवर्ती यांना भेटण्यासाठी अक्षय गेला होता. पण ते आले नव्हते. मात्र तेथे असलेल्या नरेंद्र सिंग या मेकअमनने त्याचे फोटो पाहिले आणि प्रमोद चक्रवर्ती यांच्याशी बोलून हा चांगला चेहरा आहे असे सांगितले. दुस-या दिवशी अक्षय प्रमोद चक्रवर्ती यांना भेटला आणि दीदारचा नायक झाला आणि नायिका होती करिश्मा कपूर. कॉन्ट्रॅक्ट साइन करताना त्याने राजीव भाटियाच्या ऐवजी अक्षयकुमार नाव सांगितले आणि अक्षयकुमारच उदय झाला. पहिला चित्रपट दीदार असला तरी त्याचा पहिला प्रदर्शित झालेला चित्रपट होता राज सिप्पी यांचा सौगंध. पहिला चित्रपट मिळवून देणा-या नरेंद्र सिंंग यांनाच अक्षयने आपला मेकअपमन म्हणून नेमले आणि आजही नरेंद्र सिंग अक्षयचा मेकअपमन म्हणून काम करीत आहे.

अक्षयसोबत अनेक नवे चेहरे बॉलीवुडमध्ये त्या काळात आले परंतु सगळ्यांनाच त्याच्यासारखे यश मिळाले नाही. कोणीही गॉडफादर नसताना अक्षयने मेहनत आणि चांगले संबंध याच्या जोरावर खानांच्या प्रभावातही आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आणि आज अक्षयच्या नावावर चित्रपट हातोहात विकतात असा इतिहास रचला आहे. करन जोहरने एकदा कॉफी विथ करनमध्ये अक्षयला प्रश्न विचारला होता की, बॉलीवुडमध्ये जास्त काळ कोण टिकेल? तेव्हा अक्षयने उत्तर दिले होते जर शाहरुख आणि सलमानने सिगरेट सोडली तर ते नाही तर मी. त्याचे हे उत्तर अगदी खरे कारण अक्षय निर्व्यसनी आहे.

बॉलीवुडमध्ये राहून अशी स्वतःची वेगळी इमेज निर्माण करणारा अक्षय म्हणूनच सीधा सादा अक्षय आहे

———————————————————————————————————————————————————

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER