
रावणाने सीतेचे अपहरण केले आणि सीतेला श्रीलंकेला घेऊन गेला. सीता श्रीलंकेत असल्याची माहिती हनुमानाने रामाला दिली. त्यानंतर राम वानरसेनेसह श्रीलंकेकडे निघाला. मात्र मध्ये समुद्र असल्याने समुद्रात दगड टाकून पुल बनवला. हा पुल आजही अंतराळातूनही दिसतो म्हणतात. या पुलालाच राम सेतू असे म्हटले जाते. याच राम सेतूच्या कथेवर अक्षय कुमार (Akshay kumar) याच नावाने म्हणजेच ‘राम सेतू’ (Ram Setu) नावाने सिनेमा तयार करीत आहे. या सिनेमाच्या निर्मितीत अमेझॉनही पुढे आल्याचे आम्ही तुम्हाला सांगितलेच होते. तसेच या सिनेमाचे गुरुवारपासून अयोध्येत शूटिंग सुरु होणार असल्याचेही आम्ही तुम्हाला सांगितलेच होते. अक्षयने अयोध्येत पूजा करून या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली. ‘राम सेतू’ चे दिग्दर्शक अभिषेक शर्मा करीत असून डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी क्रिएटिव्ह प्रोड्यूसर म्हणून काम करणार आहेत.
अक्षय कुमार गुरुवारी सकाळी विशेष विमानाने सिनेमातील नायिका जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि नुसरत भरुचासोबत अयोध्येला मुंबईहून रवाना झाला होता. मुंबईतून निघतानाचा एक फोटो अक्षय कुमार ने सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला होता. या फोटोत जॅकलिन फर्नांडीस आणि नुसरत भरूचा दिसत आहे. या फोटोसोबत अक्षयने लिहिले होते, स्पेशल फिल्म, स्पेशल शुरुआत… राम सेतूची टीम मुहूर्त शूटसाठी अयोध्या रवाना झाली. प्रवास सुरु झाला आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे. अयोध्येला गेल्यानंतर अक्षयने सिनेमाच्या टीमसह प्रभू श्रीरामांची पूजा केली. या पूजेचे फोटो आणि सिनेमाचे शूटिंग सुरु केल्याची माहिती अक्षयकुमारने सोशल मीडियावर शेअर केली आहे. अक्षयने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोत राम दरबाराच्या फोटोची पुजाऱ्यांकडून पूजा करताना दिसत आहे. या फोटोसोबत अक्षयने लिहिले आहे, आज श्री अयोध्येत माझा सिनेमा राम सेतूच्या शुभारंभाला प्रभू श्री रामांचा आशीर्वाद मिळाला आहे. जय श्री राम!
हा सिनेमा पुढील वर्षी रिलीज केला जाणार आहे. या सिनेमाशिवाय अक्षय सध्या ‘पृथ्वीराज’ आणि ‘बच्चन पांडे’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे, त्याचे ‘सूर्यवंशी’, ‘अतरंगी रे’ आणि ‘बेल बॉटम’ हे सिनेमे याच वर्षी रिलीज होणार आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला