अक्षय सेवाव्रती रिक्षावाला…हा खरा पुण्यभूषण

Akshay Sevavrati Rikshawala

Shailendra Paranjapeपुणं सांस्कृतिक राजधानी, शिक्षणाचं माहेरघर, देशाला दिशा देणारं शहर आणि अलीकडच्या काही दशकांमधे अटोमोबाइल, सॉफ्टवेअरचं शहर, निवृत्त्साठीचं स्थायिक होण्याचं टेस्टिनेशनही झालंय, पुणं म्हणजे सामाजिक काम करणाऱ्या संस्था कार्यकर्त्यांचं मोहोळच. त्यामुळं करोना आपत्त्तीतही त्याचं दर्शन वेगवेगळ्या रूपात घडतंय. संस्था व्यक्ती आपल्या कुवतीनुसार इतरांच्या मदतीला धावून जात असतानाच काल एका रिक्षावाल्यानं लक्ष वेधून घेतलं.

करोनामुळं झूम मीटिंग्ज, व्हर्च्युअल भेटी आणि फोनसंवाद वाढलेले असतानाच नवरी-नवरी एका ठिकाणी, नातेवाईक आणि मित्रमंडळी सुदूर अंतरावरून लग्नाच्या शुभेच्छा देताहेत, लग्नाचा पुरोहित मोबाईलच्या माध्यमातून दुरून मंगलाष्टके म्हणतोय, अशी लग्नही टीव्हीवरून लॉकडाऊनच्या काळात बघायला मिळाली. सोशल डिस्टन्सिंग पाळत झालेली लग्न टीव्ही चॅनेलसाठी भारी बातमी ठरली. आता त्याचंही फार काही वाटत नाही कारण तेही अंगवळणी पडू लागलंय.

ही बातमी पण वाचा:- पावसापूर्वी कोरोनावर करू या पूर्वकाळजीचा हल्ला

पण पुण्यामधे रिक्षाचालक असलेल्या अक्षय संजय कोठावळे याची कहाणी फारच भारी आणि आपणा सर्वांना प्रेरणा देणारी आहे. या तीस वर्षांच्या युवकाचं लग्न या आठवड्यात २५मे रोजी होणार होतं. करोनामुळं त्यानं लग्न तर पुढं ढकललंच आहे पण त्याशिवाय महत्त्वाचं म्हणजे त्यानं लग्नासाठी मेहनतीनं जमवलेले सुमारे दोन लाख रुपये लग्नावर खर्च करायचे नाहीत तर करोना भयग्रस्ततेच्या काळात पुण्यातून बाहेर जाणाऱ्या मजुरांसाठी, प्रवाशांसाठी, रस्त्यावर फिरणाऱ्या भुकेल्यांसाठी खर्च करायचं ठरवलं.

त्याच्या टिंबर मार्केटपासच्या वस्तीतल्या आसपासच्या नागरिकांनी अगदी महिलांनीही थोडी मदत केली. हा पठ्ठया रोज तीनशे साडेतीनशे लोकांचं जेवण घेऊन पुण्यात ठिकठिकाणी आपल्या रिक्षातून जाऊ लागला. मुळात रिक्षातून वयोवृद्ध नागरिक, आजारी यांना मोफत रिक्षातून सेवा तो देतोच आहे पण २३-२४मार्चपासून सकाळी उठून भुकेलेल्यांना जेवण वाटत फिरताना सोपं जावं म्हणून त्यानं रिक्षावर ध्वनिवर्धकही लावलाय. रोज सकाळी घराबाहेरच तयार केलेल्या किचनमधे जेवण तयार करून ते रिक्षातून सिंचन भवन, पुणे स्टेशन, येरवडा, मालधक्का, बंडगार्डन, महापालिका, पेठ एरिया भागात जाऊन वाटतोय. एकटे राहणारे तीसेक वृद्ध नागरिक रोज अक्षयचा डबा येण्याची वाट बघतात. त्यांची माहिती फेसबुकवरून कुणी तरी कळवलेली, त्यामुळे ज्यांचा काही परिचय नाही अशांना अक्षय रोज जेवण देतोय आणि तेही लग्नासाठी साठवलेल्या पैशातून.

शिक्षणानं डेंटल टेक्निशियन असलेल्या या युवकानं वडिलांचा रिक्षाचा व्यवसाय पोटासाठी स्वीकारलाय पण उपजीविकेपेक्षाही त्याच्या मनातल्या इतरांबद्दलच्या विशेषत: आपद्ग्रस्तांबद्दलच्या जाणिवेनं भल्याभल्यांना आश्चर्य वाटेल. सांगली-कोल्हापूरच्या पुरातही हा पठ्ठया आपत्तीग्रस्तांच्या मदतीला धावतो आणि हे सारं करताना तो आवर्जून फेसबुकवर आपण करत असलेल्या उपक्रनाची माहितीही टाकतो. त्यातून काही लोक मदत करतात तर काही सूचना करतात, असं त्याचं म्हणणं आहे. त्याची माहितीदेखील एका आरटीओ अधिकाऱ्यानं पुणे शहर अटोरिक्षा फेडरेशनच्या पदाधिकाऱ्याला सांगितली आणि त्याचा फोन नंबर घेतला. दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या वतीनं गुरुवारी अक्षयचा खास सत्कार करण्यात आला. अटोरिक्षा फेडरेशनचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि माजी खजिनदार बापू भावे, अक्षयचे सहकारी मित्र रवींद्र गायकवाड, राहूल जाधव हे अक्षयला मदत करतात.

हे सारं मार्च अखेरील सुरू करतानाकाही अडचणी होत्या म्हणून अक्षयनं काम सुरू करताना फेसबुकवर टाकलं नाही. घरी आई-वडील, भावाचं कुटुंब… त्यात वडील आजारी पडले, त्यांचं १७मे रोजी निधनही झालं. तरीही या पठ्ठयानं आपलं अन्नदानाचं काम सुरू ठेवलंय. हळूहळू ते सर्वांना समजलही. भावी पत्नीशी अक्षयचा पाचेक वर्ष परिचय आहे. लव्ह मॅरेज आहे त्यामुळं होणाऱ्या पत्नीलाही हा दरिद्रीनारायणासाठी झटणारा भावी पती आहे, हे माहीत आहे. त्यामुळं करोना संपला की अक्षय साधेपणानं विवाह करणार आहे. विवाहासाठी साठवलेले दोन लाख रुपये संपले तरी अक्षयला आयुष्यात काहीही कमी पडणार नाही कारण त्याच्या अक्षयपात्रातून अन्न मिळालेल्यांच्या लाखमोलाच्या दुवा त्याच्यासाठी अक्षय्य ठरणार आहेत. अक्षयची सामाजिक वृत्ती अक्षयरूपानं सर्वांपर्यंत पोहचो, हीच प्रार्थना….

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला