अक्षयकुमारचा ‘सूर्यवंशी’ अखेर ३० एप्रिलला रिलीज होणार

Akshay Kumar's 'Suryavanshi' will finally be released on April 30

गेल्या एक वर्षापासून रिलीजची वाट पाहाणारा रोहित शेट्टी (Rohit Shetty) दिग्दर्शित आणि अक्षयकुमार (Akshay Kumar) अभिनीत ‘सूर्यवंशी’च्या रिलीजची तारीख जाहीर करण्यात आली आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे सिनेमा रिलीज होऊ शकला नाही. आणि आता थिएटर सुरु झाली असली तरी ती पूर्ण क्षमतेने सुरु करण्याची परवानगी नसल्याने मोठे सिनेमे रिलीज करण्यास मोठे निर्माते आणि कलाकार तयार नाहीत. त्यामुळेच ‘सूर्यवंशी’च्या रिलीजवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अखेर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा विचारही सुरु झाला होता. पण सलमान खानने ‘राधे’च्या रिलीजची घोषणा केल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी रोहित शेट्टीने ‘सूर्यवंशी’च्या रिलीजची डेट घोषित केली आहे. आता हा सिनेमा ३० एप्रिलला संपूर्ण देशभरात रिलीज केला जाणार आहे.

दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या वाढदिवसाच्या दिवशीच अक्षयकुमारने सिनेमाच्या रिलीजची तारीख जाहीर केली. यासाठी एक अत्यंत उत्कृष्ट असा व्हीडियो तयार करण्यात आला असून हा व्हीडियो अक्षयने त्याच्या सोशल मीडिया (Social Media) अकाउंटवर शेअर केला आहे. १ मिनिट ४० सेकंदांच्या या व्हीडियोत, एक वर्षांपूर्वी म्हणजे २ मार्च २०२० ला सिनेमाचा पहिला ट्रेलर लाँच केला होता. यावेळी अक्षय, अजय देवगन (Ajay Devgn), रणवीर सिंह (Ranveer Singh), कॅटरीना कैफ (Katrina Kaif), रोहित शेट्टी (Rohit Shetty) उपस्थित होते आणि मस्ती करीत असताना दिसत आहेत. या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाल्याचेही व्हीडियोत म्हटले आहे. मात्र त्यानंतर अचानक असे काही झाले की सगळेच चित्र बदलून गेले. कोरोनामुळे बदलेल्या स्थितीचे चित्रणही या व्हीडियोत केले आहे. यानंतर म्हटले आहे की, आम्ही तुम्हाला वचन दिले होते की योग्य वेळ येताच आम्ही थिएटरमध्ये येऊ. एक वर्ष होऊन गेले परंतु आम्ही तुम्हाला दिलेले वचन आता पूर्ण करीत आहोत. प्रतीक्षा आता संपली आहे. या वाक्यानंतर अक्षयकुमार हेलीकॉप्टरमधून उतरताना दिसतो आणि म्हणतो पोलीस येतायत. यानंतर सिनेमातील काही सीन्स दाखवले आणि रिलीजची तारीख जाहीर केली आहे.

हा व्हीडियो शेअर करीत अक्षयने याला कॅप्शन दिली असून त्यात त्याने लिहिले आहे, ‘आम्ही तुम्हाला मोठ्या थिएटरमध्ये एक वेगळा अनुभव देण्याचे वचन देत आहोत आणि तुम्हाला हा अनुभव मिळेलच. शेवटी प्रतीक्षा संपली असून पोलीस आले आहेत.’

हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करेल असे बॉलिवूडमझध्ये म्हटले जाऊ लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER