तीन सिनेमासाठी अक्षयने घेतले 127 कोटी

अभिनेता अक्षय कुमारने (Akshay Kumar) निर्माता दिग्दर्शक आनंद एल. रायसोबत तीन सिनेमाचे करार केले आहे. हे तीन सिनेमे आहेत ‘अतरंगी रे’, ‘रक्षा बंधन’ आणि एक अनाम सिनेमा. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षयकुमारने या तीन सिनेमांसाठी केलेला करार 127 कोटी रुपयांचा आहे. काही महिन्यांपूर्वी बातमी आली होती की, अक्षयने त्याची फी वाढवली असून ती एका सिनेमासाठी 130 कोटी रुपये केली आहे. अक्षयने त्याच्या मानधनात वाढ केली हे खरे आहे पण आनंद एल, रायसोबत मात्र त्याने तीन सिनेमांसाठी 127 कोटी रुपयांचाच करार केला आहे. आनंद एल. रायच्या ‘अतरंगी रे‘मध्ये अक्षयसोबत सारा अली खान आणि धनुष यांच्या भूमिका आहेत.

‘अतरंगी रे’ चे पहिले शूटिंग शेड्यूल बनारसपासून 45 किमी दूर असलेल्या चकिया (चंदौली) येथे पार पडले. येथे एक पडका वाडा असून वाड्याची डागडुजी करून तेथे सिनेमाचे शूटिंग करण्यात आले. 60 वर्षांपूर्वी या वाड्यात एका हिंदी सिनेमाचे शूटिंग झाले होते अशी माहिती तेथील ग्रामस्थांनी दिली. सिनेमाची कथा बिहार ते दक्षिण भारत असा प्रवास करणारी असल्याने या सिनेमाचे तसे शूटिंग केले जाणार आहे.

अक्षयकुमारने ‘अतंरगी रे’चे पहिले शूटिंग शेड्यूल नुकतेच पूर्ण केले असून आता तो ‘बच्चन पांडे’च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. अक्षय 15 मार्चनंतर ‘अतरंगी रे’च्या दुसऱ्या शूटिंग शेड्यूलमध्ये भाग घेणार आहे. यासाठी मुंबईच्या गोरेगाव येथील फिल्मसिटीमध्ये 8 कोटी रुपये खर्च करून एक भव्य सेट उभारला जाणार आहे. या सेटवर अक्षयकुमार, सारा अली आणि जवळ जवळ 1 हजार ज्यूनियर डांसरवर एका गाण्याचे शूटिंग केले जाणार असून या गाण्याची कोरियोग्राफी गणेश आचार्य करणार आहे. धनुषही त्याच्या हॉलिवूडच्या सिनेमासाठी अमेरिकेला गेला असून तोसुद्धा मार्चच्या शेवटच्या आठवड्यात भारतात परतणार असल्याचे सांगितले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER