अक्षयकुमारने सुरु केले ‘राम सेतू’चे शूटिंग

Maharashtra Today

गेल्या वर्षी दिवाळीच्या मुहुर्तावर अक्षय कुमारने (Akshay Kumar) त्याच्या नव्या ‘राम सेतू’(Ram Setu) सिनेमाची घोषणा केली होती. अक्षयने या सिनेमाची घोषणा केल्याबरोबर बॉलिवूडमध्ये या सिनेमाविषयी चर्चा सुरु झाली होती. एवढेच नव्हे तर गुगलवर राम सेतू शोधणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाली होती. त्यानंतर आता काही दिवसांपूर्वी त्याने अयोध्येला जाऊन ‘राम सेतू’ सिनेमाचा मुहुर्तही केला होता. मुहुर्तानंतर आता त्याने होळीच्या दुसऱ्या दिवशी उत्तर प्रदेशमध्ये ‘राम सेतू’ सिनेमाचे शूटिंग सुरु केले. स्वतः अक्षयनेच सिनेमाचे शूटिंग सुरु केल्याची माहिती सोशल मीडियावर दिली असून यासोबत त्याने सिनेमातील त्याच्या नव्या लुकचा फोटोही शेअर केला आहे. त्याचा हा नवा लुक प्रेक्षकांना खूपच आवडल्याचे त्याच्या पोस्टला मिळालेल्या लाईक्सवरून दिसून येत आहे.

‘राम सेतू’ सिनेमाची कथा भारत आणि श्रीलंकेदरम्यान समुद्रात बांधलेल्या दगडाच्या पुलावर आधारित आहे. यापुलाची लांबी जवळ जवळ ४८ किमी असल्याचे सांगितले जाते. या पुलाला अॅडम ब्रीज असेही म्हटले जाते. रामायण काळातील हा पुल आजही समुद्रात असल्याचे म्हटले जाते. या पुलाभोवतीच या सिनेमाची कथा गुंफण्यात आली असून रामायण काळात खरोखरच असा पुल बांधण्यात आला होता याची माहिती हा सिनेमा देणार आहे. या सिनेमासाठी स्पेशल इफेक्ट्स आणि व्हीएफएक्सचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जाणार असून यासाठी हॉलिवूडची टीम बोलावण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. सध्या टॉकिंग पोर्शन पूर्ण केला जाणार असून नंतर व्हीएफएक्स शूटिंग केले जाणार आहे. या सिनेमात अक्षय कुमार एका पुरातत्व अधिकाऱ्याची भूमिका साकारीत आहे. अक्षय प्रथमच अशा प्रकारची भूमिका साकारीत असून त्याने त्याच्या लुकवर प्रशंसकांकडून प्रतिक्रियाही मागवल्या आहेत. त्याचा हा फोटो प्रचंड व्हायरल झाला असून प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर लाईकही केला आहे.

राम सेतूमध्ये जॅकलीन फ़र्नांडिस आणि नुसरत भरूचाही काम करीत असून सिनेमाचे दिग्दर्शन अभिषेक शर्मा करीत आहे. तर डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी या सिनेमाशी क्रिएटिव्ह प्रोड्यूसर म्हणून जोडले गेले आहेत. हा सिनेमा पुढील वर्षी रिलीज केला जाणार आहे. विशेष म्हणजे अमेझॉन या सिनेमाच्या माध्यमातून हिंदी सिनेमाच्या निर्मितीतही उतरत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button