५०० कोटींच्या भरपाईसाठी अक्षयकुमारने दिली नोटीस

राशिद सिद्दिकीचे ‘बदनामीकारक व्हिडीओ’

Akshay Kumar - Rashid Siddhiqui

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्युप्रकरणाशी आपला नाहक संबंध जोडणारे धादांत खोटे व विपर्यस्त व्हिडीओ यूट्यूबवर प्रसिद्ध करून बदनाम केल्याबद्दल बॉलिवूडचा (Bollywood) अभिनेता अक्षयकुमार (Akshay Kumar) याने यूट्यूब कन्टेन्ट मेकर राशिद सिद्दिकी (Rashid Siddhiqui) यास ५०० कोटी रुपये भरपाईसाठी कायदेशीर नोटीस पाठविली आहे.

सिद्दिकीने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर प्रसिद्ध केलेल्या एकूण १२ व्हिडीओंच्या संदर्भात ही नोटीस आहे. सिद्दिकीने अब्रुनुकसानीपोटी तीन दिवसांत ५०० कोटी रुपये द्यावेत, सर्व आक्षेपार्ह व्हिडीओ यूट्यूबवरून काढून टाकावेत आणि जाहीर माफी मागावी, अशी मागणी वकिलामार्फत पाठविलेल्या नोटिशीत अक्षयकुमारने केली आहे. तसे न केल्यास बदनामीचा खटला दाखल करण्याचा इशाराही त्यात देण्यात आला आहे.

सिद्दिकीच्या व्हिडीओंमधील ज्या मजकुरास अक्षयकुमारने प्रामुख्याने आक्षेप घेतला आहे, त्यात खालील प्रतिपादनांचा समावेश आहे :

  • अक्षयकुमारने रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) कॅनडाला पळून जाण्यासाठी मदत केली.
  • सुशांत सिंहच्या मृत्यूचे प्रकरण कसे हाताळायचे याविषयी अक्षयकुमारने महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली.
  • ‘एम.एस. धोनी’ या चित्रपटातील प्रमुख भूमिका आपल्याला मिळावी अशी अक्षयकुमारची खूप इच्छा होती. परंतु ती भूमिका करण्यासाठी सुशांत सिंहची निवड झाल्याने अक्षयकुमार नाराज झाला व सुशांतविषयी त्याच्या मनात अढी निर्माण झाली.

सत्याचा जराही मागमूस नसलेले हे व्हिडीओ सिद्दिकी याने त्याच्या यूट्यूब चॅनेलचे दर्शक वाढावेत या एकमेव उद्देशाने प्रसिद्ध करून आपली अपरिमित बदनामी केली, असा अक्षयकुमारचा आरोप आहे.

काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांच्याविषयीचा एक बदनामीकारक व्हिडीओ प्रसिद्ध केल्याबद्दल याच सिद्दिकीवर ‘बीकेसी’ येथील ‘सायबर’ शाखेच्या पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. पण दंडाधिकाऱ्यांनी त्याला १५ हजार रुपयांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER