अक्षयने पूर्ण केले ‘अतरंगी रे’ चे शूटिंग

Maharashtra Today

अक्षय कुमार (Akshay Kumar) त्याच्या सिनेमांचे शूटिंग वेळेवर पूर्ण करीत असल्याने अनेक निर्माते त्याला आपल्या सिनेमात घेण्यासाठी धडपडत असतात. केवळ तो सिनेमा वेळेवर पूर्णच करतो असे नाही तर त्याचे सिनेमे बॉक्स ऑफिसवरही कमाईचा विक्रम करीत असतात त्यामुळेही निर्माते त्याला साईन करण्यासाठी धावत असतात. त्याचमुळे बॉलिवूडमधील आघाडीच्या नायकांपैकी सध्या सगळ्यात जास्त सिनेमे अक्षयकडेच आहेत. यापैकीच एक सिनेमा आहे ‘अतरंगी रे’. अक्षयने या सिनेमाचे शूटिंग नुकतेच पूर्ण केले असून सोशल मीडियावर सिनेमाच्या शेवटच्या दिवसाच्या शूटिंगच्या वेळचा फोटो टाकून सिनेमा पूर्ण केल्याची माहिती दिली आहे.

आनंद एल. राय (Anand L. Rai) दिग्दर्शित ‘अतरंगी रे’ या सिनेमात अक्षय कुमारसोबत रजनीकांतचा जावई आणि साऊथचा हिट स्टार धनुष (Dhanush) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) दिसणार आहेत. धनुषला नुकताच त्याच्या ‘असुरन’ सिनेमासाठी उत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला असून सध्या तो हॉलिवूडमध्ये एका हॉलिवूडपटाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. गेल्या वर्षी आनंद एल. रायने या सिनेमाला सुरुवात केली होती. त्यावेळी धनुष आणि सारासोबत हृतिक रोशनला घेण्याचा विचार सुरु होता. परंतु हृतिकने डेट्स नसल्याने सिनेमा करण्यास नकार दिला तेव्हा आनंद एल. रायने थेट अक्षयकुमारकडे धाव घेतली आणि त्याला काम करण्यासाठी गळ घातली. अक्षयकुमारची या सिनेमात पाहुण्या कलाकाराची भूमिका असली तरी त्यासाठी त्याने प्रचंड रक्कम आकारली आहे आणि विशेष म्हणजे निर्मात्यांनी त्याला ती रक्कम दिलीही.

अक्षयने शनिवारी त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो टाकला आहे. या फोटोत तो जादुगराच्या रुपात दिसत असून डोक्यावर हॅट आणि त्याच्या हातात पत्त्याच्या खेळातील राजा दिसत आहे. यावरून अक्षय ‘अतरंगी रे’ या सिनेमात जादुगराची भूमिका साकारत आहे की काय असा प्रश्न पडला आहे. या फोटोसोबत अक्षयने लिहिले आहे, ‘अतरंगी रे’च्या शूटिंगचा हा शेवटचा दिवस आहे. आनंद एल. रायद्वारा तयार करण्यात आलेला हा जबरदस्त प्रोजेक्ट कधी रिलीज होईल याची वाट पाहाणे कठिण होत आहे. सिनेमातील माझे को स्टार सारा अली खान आणि धनुषचे खूप खूप आभार. अक्षयने त्याच्या या पोस्टमध्ये सिनेमाचा लेखक हिमांशु शर्माला टॅग केले आहे. तसेच ए. आर. रहमानने (A. R, Rahman) या सिनेमाला संगीत दिले असल्याने त्याचेही आभार मानले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER