भारतीय जैन संघटना व प्रशासनाच्या माध्यमातून अकोला जिल्हा दुष्काळमुक्त केला जाणार – पालकमंत्री

Akola District will be relieved of drought by the Jain organization of India and through administration - Guardian Minister

अकोला : जलसंधारणाच्या कामात भारतीय जैन संघटनेचे काम अत्यंत कौतुकास्पद आहे, सुजलाम् सुफलाम् अकोला अंतर्गत आपला जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी ही संघटना जलसंधारणाच्या कामाकरिता विनामुल्य मशिन्स उपलब्ध करुन देणार आहे, या संधीचे निश्चितपणे सोने केले जाईल. ही संघटना आणि प्रशासनाच्या सहकार्यातून अकोला जिल्हा सुजलाम् सुफलाम् केला जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले.

अकोला जिल्हा कायम दुष्काळ मुक्त करण्यासाठी सुजलाम् सुफलाम् अकोला अभियानातंर्गत मृद व जलसंधारण विभाग आणि भारतीय जैन संघटना यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराप्रमाणे जलसंधारण कामे अंमलबजावणीबाबत आज नियोजन भवनात कार्यशाळा पार पडली. यावेळी महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा खासदार संजय धोत्रे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई वाघोडे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार बळीराम सिरस्कार, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त पीयुष सिंह, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, माजी राज्य मंत्री अजहर हुसेन, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा, भारतीय जैन संघटनेचे राज्य अध्यक्ष अमर गादिया आदी उपस्थित होते.

पृथ्वीतलावर पाणी हा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे, त्यामुळे त्याचा प्रत्येक थेंब वाचवणे गरजेचे आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, जलयुक्त शिवारच्या माध्यमातून राज्यात जलसंधारणाची मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत. यामध्ये शासन, प्रशासनाबरोबरच लोकसहभागाचा मोठा वाटा आहे. जलसंधारणाच्या कामासाठी भारतीय जैन संघटनेने केलेले सहकार्यही बहुमुल्य आहे. मागील वर्षी बुलडाणा जिल्ह्यात या संघटनेने उत्कृष्ट काम केली आहेत. यावर्षी ही संघटना अकोला जिल्ह्यात प्रशासनाच्या मदतीने जलसंधारणाची कामे करणार आहेत. या कामांसाठी शासन या संघटनेच्या पाठिशी आहे. जलसंधारणाच्या कामांसाठी ठरविण्यात आलेले उद्दीष्ट वेळेत पूर्ण करुन अकोला जिल्हा निश्चितपणे दुष्काळमुक्त केला जाईल.

श्री. मुथा म्हणाले की, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी भारतीय जैन संघटना जलसंधारणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत आहे. बुलडाणा जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसंधारणाच्या कामाकरिता संघटनेने मार्च महिन्यात सुमारे 134 जेसीबी मशिन व पोकलेन उपलब्ध करुन दिले. अवघ्या तीन महिन्यांत या जिल्ह्यात जलसंधारणाची अनेक कामे झाली. आता अकोला जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी आम्ही मशिन उपलब्ध करुन देणार आहोत. यासाठी प्रशासनाला आमचे संपूर्ण सहकार्य राहिल. सर्वांच्या समन्वयातून अकोला दुष्काळमुक्त केला जाईल, अशी ग्वाही देत त्यांनी जलसंधारणाच्या कामासाठी येत्या तीन दिवसांत 40 जेसीबी मशिन उपलब्ध करुन देण्यात येतील, असे सांगितले.

यावेळी खासदार श्री. धोत्रे, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांनी विचार व्यक्त केले. प्रास्ताविक जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केले.

जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. बोके यांनी अकोला जिल्ह्यातील प्रस्तावित जलसंधारणाच्या कामांचे सादरीकरण केले. पाणी फाउंडेशन अंतर्गत जिल्ह्यात करण्यात आलेल्या उत्कृष्ट कामांबद्दल यावेळी श्री. डवले साहेबांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई वाघोडे, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. सूत्रसंचालन शैक्षणिक गुणवत्ता कक्षाचे समन्वयक प्रकाश अंधारे यांनी तर आभार प्रदर्शन उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर यांनी केले.