आकाश म्हणतोय .. देशासाठी कायपण

Akash Thosar

पहिल्यावहिल्या सिनेमातच टीन एजर प्रेमाची कथा सांगणाऱ्या आकाश ठोसर (Akash Thosar) या अभिनेत्याने एका रात्रीत नशीब बदलणं म्हणजे काय असतं हे अनुभवलं. एका गावात कुस्ती शिकण्यासाठी आलेला मुलगा नागराज मंजुळेसारख्या दिग्दर्शकाच्या नजरेला पडतो आणि त्यानंतर त्याची सैराट या तुफान गाजलेल्या सिनेमात वर्णी लागते. त्यानंतर त्याचं आयुष्य बदलून जातं. सिनेमाच्या कथेलाही लाजवेल अशी स्टोरी आकाशच्या आयुष्यात प्रत्यक्ष घडून आली.

मराठी सिनेमा बॉक्स ऑफिसवर कोटीच्या घरात पोहोचवण्यात आकाशच्या अभिनयाचा फार मोठा वाटा होता. अशा पद्धतीचे यश मिळेल या संधीच्या शोधात आकाश नव्या सिनेमात दिसला. त्याचा दुसरा सिनेमा म्हणजे फनअनलिमिटेड जो महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केला होता. मात्र या सिनेमाची जादू फारशी चालली नाही. दरम्यानच्या काळात आकाश काही पुरस्कार सोहळे आणि रियालिटी शो यामधून त्याच्या चाहत्यांना भेटत होता पण आकाशला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी त्याचे चाहते खूपच आतुर होते. आता आकाश वेबसिरीजच्या माध्यमातून एका सैनिकाच्या भूमिकेत झळकणार आहे. ‘1962 द वर्ड इन द हिल्स’ या वेब सिरीजमध्ये आकाश एका जवानाची भूमिका वठवणार असून यासाठी आकाशने सोल्जर कट करून सैनिकाचा लूक असलेले फोटो शेअर केले आहेत. सैराट आणि फन अनलिमिटेड या दोन्ही सिनेमात आकाश हा चॉकलेट बॉय म्हणून पडद्यावर दिसला होता. प्रेमासाठी वाट्टेल ते अशा त्याच्या या दोन्ही भूमिका होत्या. मात्र आता त्याच्या या नव्या वेबसिरीजमध्ये देशासाठी वाट्टेल ते असं म्हणणाऱ्या जवानाची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी आकाश देखील प्रचंड उत्सुक आहे. ही वेबसीरिज महेश मांजरेकर हेच दिग्दर्शित करत असल्यामुळे फन अनलिमिटेड या सिनेमात आकाश आणि महेश मांजरेकर यांची गट्टी जमली होती. त्यामुळे हीच भट्टी पुन्हा एकदा या निमित्ताने जुळून आलेली आहे.

मध्यंतरीच्याकाळात आकाशने त्याच्या भाषेवर खूप काम केलं, कारण की तो ग्रामीण भागात लहानाचा मोठा झालेला असल्यामुळे त्याची बोली भाषा हा त्याच्यासाठी नवनवीन भूमिकांच्या संधी मधला अडथळा ठरेल की काय अशी शंका अनेकदा मनोरंजन इंडस्ट्रीमधून व्यक्त केली जात होती. पण मध्यंतरीच्या काळात आकाशने त्याच्यामध्ये खूप बदल केले आहेत . अभिनयातच करिअर करायचे हे ठरवून आता तो त्याच्या भूमिकांविषयी चोखंदळदेखील झाला आहे. वेबसिरिज सारख्या आजच्या युगाच्या माध्यमातून आकाश एका सैनिकाच्या भूमिकेत येणार असून ही सिरीज सत्य घटनेवर आहे. म्हणूनच ही कथा प्रत्यक्ष पडद्यावर येण्यापूर्वी सगळ्याच टीमने एक अभ्यास म्हणून हा प्रोजेक्ट केला आहे. त्यामध्ये आकाशने सहभाग दिला आहे.

शाळा-कॉलेजमध्ये इतिहासाच्या पुस्तकात भारत आणि चीन युद्धाचा केलेला अभ्यास आकाशला या सिनेमात सैनिकाची भूमिका वठवण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल.

फेब्रुवारी अखेर ही वेब सिरीज प्रदर्शित होणार आहे. पडद्यावरच नव्हे तर प्रत्यक्ष आयुष्यातही आकाशला सैन्यात भरती व्हायचं होतं. तसा प्रयत्न देखील त्याने केला होता. इतकेच नव्हे तर पोलिस भरती होऊन होण्याचे स्वप्नही आकाशने पाहिलं होतं. पोलीस भरतीसाठी लागणाऱ्या दोन परीक्षाही आकाशने दिल्या आहेत. पण सैराट नावाच्या एका सिनेमाने त्याचं करिअर हे सैनिक, पोलीस या स्वप्नापासून त्याला दूर नेणारं ठरलं आणि तो अभिनयाकडे वळला. पण असं म्हणतात की एखाद्या अभिनेत्याला कुठल्याही प्रोफेशनची भूमिका करायला मिळाली तरी तो काही वेळ त्या भूमिकेत का असेना त्या व्यक्तीचं आयुष्य जगत असतो, अनुभवत असतो. म्हणूनच आकाशला त्याच्या मनात असलेली सैनिकाची भूमिका या नव्या वेबसिरिजच्या माध्यमातून जगता येणार आहे याचा आकाश ला खूप आनंद झाला आहे.

आकाश सांगतो, सैन्यात दाखल व्हायचं स्वप्न मी लहानपणापासूनच पाहिलं होतं. त्यासाठी परीक्षा देणं, स्वतःची शारीरिक क्षमता तयार करणे यासाठी माझे प्रयत्न सुरू होते, पण माझ्या नशिबात अभिनेता होणं हेच लिहिलं होतं. कदाचित मी जर अभिनयात करिअर केलं असतं तर मी आज देशाच्या सीमेवर लढताना दिसलो असतो इतकं माझं सैनिक होण्याचं पॅशन होतं. पडद्यावर सैनिकाची भूमिका मी पहिल्यांदाच करत आहे त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं दडपण अभिनेता म्हणून माझ्यावर आहे. जेव्हा ही भूमिका करण्यासाठी मी सैनिकाची वर्दी परिधान केली तेव्हाच एक वेगळं संचारलेपण माझ्या अंगात भिनलं. सैनिक हे काय आहेत, त्यांची देशाविषयीची काय भावना आहे हे फक्त त्यांची ओळख सांगणारी वर्दी घातल्यानंतर एका क्षणात मी सैनिकांच्या मानसिकतेमध्ये जाऊन पोहोचलो. खरच या देशासाठी सीमेवर रात्रंदिवस लढतात त्यांनी देशाच्या सुरक्षेसाठी कशाप्रकारे स्वतःला वाहून घेतलं असेल याची मला नक्कीच जाणीव झाली. या सिरीजच्या माध्यमातून मी त्यांचे आयुष्य जवळून अनुभवणार आहे याचं समाधान अभिनेता म्हणून माझ्यासाठी खूप मोठं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER