आकाशची मच्छीकरी थेट शेतात

Akash Thosar

कोरोनामुळे लॉकडाऊन (Lockdown) काळात आपण प्रत्येक सेलिब्रिटीचे रेसिपी मिशन पाहिले. अर्थातच मालिका, सिनेमा, नाटक हे सगळेच बंद असल्यामुळे कलाकारांकडे कधी नव्हे तो इतका वेळ होता की त्यांनी राहून गेलेल्या अनेक गोष्टी करून घेतल्या. त्यामध्ये बहुतांशी कलाकार आघाडीवर होते ते वेगवेगळ्या रेसिपी करण्यामध्ये. पण आता लॉकडाऊन संपल्यानंतर अभिनेता आकाश ठोसर (Akash Thosar) त्याच्या गावाकडच्या शेतात पोहचला आहे आणि त्या शेतात चुलीवर मच्छीकरी (Fishcurry) बनवत त्याने त्याच्यातल्या शेफला जागं केलं आहे.

आकाशने हा व्हिडीओ त्याच्या सोशल मीडिया (Social Medai) पेजवरून चाहत्यांपर्यंत पोहचवला असून त्याच्या मच्छीकरीचा ऑनलाईन स्वाद घेत चाहत्यांनी त्याला खूप सार्‍या कमेंट दिल्या आहेत.

‘सैराट’ या बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजलेल्या सिनेमाने आकाश ठोसर या अभिनेत्याला रातोरात स्टार केलं. खरं तर आकाश पहिलवान होण्याचे स्वप्न पाहात होता आणि त्यासाठी तो सोलापूरमधल्या तालमीत कुस्तीचे धडे गिरवायला आला होता. दरम्यान ‘सैराट’ सिनेमासाठी नायकाचा शोध घेत असलेल्या दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची नजर आकाशवर पडली आणि त्यानंतर आकाशचं सगळं आयुष्यच बदलून गेलं. ‘सैराट’ या सिनेमात आकाशने साकारलेली परश्या म्हणजेच प्रशांत काळे ही भूमिका तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या प्रत्येक तरुणाला आपलीशी वाटली. आजवर प्रेम या विषयावर अनेक सिनेमे, नाटक, मालिका पडद्यावर आल्या. तरीही ‘सैराट’मधला रांगडा परश्या अनेकांना आवडून गेला. या एकाच सिनेमातून आकाश ठोसरला मिळालेल्या प्रचंड प्रसिद्धीमुळे आकाशच्या फॅन फॉलोवर्समध्येदेखील इतकी वाढ झाली की तो सध्या काय करत आहे याकडे त्याच्या चाहत्यांचं नेहमीच लक्ष लागून राहिलेलं असतं. लॉकडाऊनमध्येही त्याने गावाकडच्या घरातील अनेक व्हिडीओ शेअर केले होते.

नुकताच त्याने त्याच्या इन्स्टा अकाउंटवर एक असा व्हिडीओ शेअर केला आहे, तो पाहून आकाशच्या पाककलेवर अनेक जण फिदा झाले आहेत. आकाश सोलापूर तालुक्यातील करमाळा या परिसरातील एका शेतावर नुकताच गेला. त्या शेतामध्ये तीन दगडांची चूल मांडून त्याने सुरमई करी आणि फ्राय करण्याचा घाट घातला. सुरमईचा रस्सा आणि तळलेली सुरमई आकाशने बनवली. त्यानंतर त्याने मित्रांसोबत या मच्छीकरीचा फडशा पाडला.

आकाश सांगतो की, सुरुवातीपासूनच मला पहिलवान बनायचे होते. त्यामुळे पहिलवानकीसाठी व्यायाम करत असताना चांगलं खाण्याची सवय लागली. त्यात मला मासे खायला प्रचंड आवडतं. जेव्हा जेव्हा मी बाहेर फिरायला जातो तेव्हा माझं लक्ष त्या त्या शहरातील माशांच्या कुठल्या डिश आहेत याकडे लागून राहिलेलं असतं. ‘सैराट’मध्ये मी वठवलेली परश्याची भूमिकाही मासेमारी करणाऱ्या कुटुंबातीलच असल्यामुळे या सिनेमाच्या शूटिंगच्या वेळेला मी मासेमारीचा आनंद घेतला होता; शिवाय आम्ही सिनेमाच्या सेटवर अनेकदा मासे बनवले होते. ती आठवण मला आता शेतामध्ये मासे बनवताना आली. आकाश रिकाम्या वेळी नेहमीच वेगवेगळे पदार्थ बनवत असतो; पण आता थेट शेतात जाऊन त्याने बनवलेली मच्छीकरी पाहिल्यानंतर आकाशच्या हातची मच्छी कधी खायला मिळणार, असा प्रश्न त्याच्या चाहत्यांनी विचारला आहे.

आकाशचा जन्म जरी सोलापूरमधल्या करमाळा येथे झाला असला तरी त्याचे शिक्षण पुण्यात झाले आहे. त्यामुळे बऱ्याचदा तो पुण्यात जातो; मात्र पुण्यात त्याला म्हणावी तशी मनासारखी मच्छीकरी खाता येत नाही आणि म्हणूनच गावाकडे गेल्यानंतर त्याने हा मच्छीकरी करण्याचा बेत आखला होता. ‘सैराट’नंतर आकाशने महेश मांजरेकर यांच्या ‘एफयू’ या सिनेमात काम केलं होतं. मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चालला नाही; परंतु अजूनही आकाशची त्याच्या चाहत्यांमध्ये असलेली क्रेझ कायम आहे.

ही बातमी पण वाचा : माऊचा मास्क हरवला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER