अजनी इंटरमोडल स्टेशन प्रकल्प; आराखडा तयार करण्याचे गडकरी यांचे निर्देश

Ajni Intermodal Station Project - Nitin Gadkari - Maharashtra Today
Ajni Intermodal Station Project - Nitin Gadkari - Maharashtra Today

नागपूर :- अजनी इंटरमोडल स्टेशनच्या प्रकल्पात (Ajni InterModal Station Project) बाधित होणार्‍या झाडे-झुडपांच्या मोबदल्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने महानगरपालिकेच्या सीमेत २५ हजार झाडांचे वृक्षारोपण तसेच पाच हजार झाडांचे प्रत्यारोपण करावे. तीन मीटरपेक्षा उंच असलेली सर्व झाडे ई-टॅग करावी व लवकरात लवकर हे काम सुरू करावे असे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक, परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आज प्राधिकरणाला दिले आहेत.

शुक्रवार ४ जून रोजी सायंकाळी या संदर्भात गडकरी यांनी बैठक आयोजित केली होती. या बैठकीला महापौर दयाशंकर तिवारी, मनपाचे आयुक्त राधाकृष्णन बी, आ. प्रवीण दटके, आ. मोहन मते, एनएचएआयचे प्रादेशिक संचालक राजीव अग्रवाल, नीरीचे माजी संचालक सतीश वटे, पर्यावरण संरक्षण क्षेत्रात काम करणारे संघटनांचे प्रतिनिधी स्वानंद सोनी, कौस्तुभ चॅटर्जी, निशांत गांधी व अन्य अधिकारी उपस्थित होते. शहरातील रस्ते, राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते, रिंग रोड, सिमेंट रोड या रस्त्यांच्या शेजारी ही झाडे प्रत्यारोपित करण्यात यावी. प्रत्यारोपणासाठी महापालिकेने जागा सुचवाव्यात. त्या ठिकाणी एनएचएआय झाडांचे प्रत्याारोपण करेल. वृक्षारोपण व प्रत्यारोपण झालेली झाडे जगली पाहिजेत, यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असेही गडकरी म्हणाले.

दोन वर्षांपूर्वी हा प्रकल्प असून प्रचंड ताकदीने नागपुरात आणला गेला आहे. १३०० कोटी रुपये या प्रकल्पावर खर्च होणार आहेत. जुलैअखेरपासून वृक्षारोपण व झाडांचे प्रत्यारोपण करण्याचे काम सुरू व्हावे. वृक्षारोपण व झाडांच्या प्रत्यारोपणासाठी नीरीचे माजी संचालक डॉ. सतीश वटे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात यावी. या समितीत पर्यावरणतज्ज्ञांचा समावेश असेल. तसेच शासकीय अधिकारीही असतील. ही समिती वृक्षारोपण व प्रत्यारोपण झालेल्या झाडांवर देखरेख ठेवेल आणि ती सक्षम होईपर्यंत त्या झाडांची काळजी घेईल. या समितीतर्फे मनपा व एनएचएआयला सूचना देण्यात येतील. प्रत्यारोपण यशस्वी झाले की नाही हेही समिती ठरवेल. वृक्षारोपण आणि झाडांच्या प्रत्यारोपणाचा एक आराखडा मनपाने तयार करावा व तो राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला द्यावा. वृक्षारोपण व झाडांच्या प्रत्यारोपणाबाबत मनपाने पर्यावरणपूरक धोरण तयार करून वृक्षसंवर्धन करावे, असेही निर्देश या बैठकीत देण्यात आले. मनपाने पुणे व मुंबई येथील मनपात बाधित झाडे हटविण्यासाठी कोणत्या पद्धतीने परवानगी दिली जाते, प्रत्यारोपणासाठी काय धोरण आहे, याचा अभ्यास करून नागपूर महापालिकेने धोरण तयार करावे. महापालिकेत फक्त एक झाड कापले तर पाच झाडे लावावी लागतील, एवढेच धोरण सध्या आहे. पण काळानुसार बदलणे आवश्यक असून या संदर्भात अभ्यासांती एक धोरण तयार व्हावे, अशी अपेक्षाही गडकरी यांनी व्यक्त केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button