
पुणे : राज्याचे माजी गृहमंत्री, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या आठवणी राष्ट्रवादीचे नेते सदैव काढत असतात. नुकताच आबा पाटील यांच्या भावाचा पुण्यात सत्कार झाला. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनाही आबा पाटील यांची आठवण झाली.
आर. आर. आबा यांचे बंधू राजाराम पाटील यांची पिंपरी पोलीस आयुक्तालयातून कोल्हापूरला बदली झाली आहे. त्यानिमित्त अजित पवार यांच्या हस्ते राजाराम पाटलांचा सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर भाषण करताना अजित पवार यांनी आर. आर. पाटील यांची आठवण काढली. आबा आपल्याला लवकर सोडून गेले, असं म्हणताना अजितदादा गहिवरले. तसेच, “भाऊ गृहमंत्री असूनही राजाराम पाटील यांनी त्याचं कधीच भांडवल केलं नाही.
नाही तर काही जणांचा लांबचा पाहुणा गृहमंत्री असला तरी तो पोलीस आयुक्तालय चालवतो, मात्र राजाराम पाटील यांनी कधीच गैरफायदा घेतला नाही.” अशा शब्दात अजित पवारांनी राजाराम पाटील यांचे कौतुक केले.
आबा पाटील यांचे बंधू राजाराम पाटील
सहायक पोलीस आयुक्तपदी सेवा बजावताना राजाराम पाटील यांना १५ ऑगस्ट २०१९ रोजी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले होते. उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदक मिळाले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती शौर्य पदक, पोलीस शौर्य पदक, उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक तर गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक जाहीर करण्यात येतात. राजाराम रामराव पाटील जवळपास दोन वर्षांपासून सहायक पोलीस आयुक्त म्हणून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत होते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला