अशक्य ते शक्य करणारा नेता म्हणजे अजितदादा; नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी मानले आभार

Ajit Pawar

सोलापूर :- कोरोना (Corona) संकट आणि कडक संचारबंदीच्या काळात आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या नर्सिंगच्या विद्यार्थ्यांच्या मानधनाचा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका झटक्यात सोडवला. त्यामुळे भारावून गेलेल्या या विद्यार्थ्यांनी हातात पोस्टर घेऊन ‘थँक्यू अजितदादा’ म्हणत अजित पवार (Ajit Pawar) यांचे हटके आभार मानले आहेत. कोरोना संकट आणि लॉकडाऊनच्या काळात जीवाची पर्वा न करता सोलापूरमधील एएनएम आणि जीएनएममधील नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी घरोघरी जाऊन कोरोना सर्व्हे केला होता.

त्यासाठी नर्सिंग महाविद्यालयातील या विद्यार्थ्यांना पायपीटही करावी लागली होती. या विद्यार्थ्यांना त्या बदल्यात मानधन देण्याचे आश्वासन सोलापूर महापालिकेकडून देण्यात आले होते. मात्र, सर्व्हे झाल्यानंतरही या विद्यार्थ्यांना मानधन देण्यात आले नव्हते. त्यामुळे विद्यार्थी संतापले होते. या विद्यार्थ्यांनी थेट महापालिकेवर मोर्चा काढून मानधन देण्याची मागणीही केली होती. मानधन न दिल्यास सर्व्हे करण्याचं काम थांबवू, असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला होता. मात्र, तरीही पालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यानंतर दिनांक १७ ऑक्टोबर २०२० रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी या विद्यार्थ्यांनी अजित पवारांची भेट घेऊन त्यांच्यापुढे समस्या मांडली.

अजितदादांनीही या विद्यार्थ्यांची गाऱ्हाणी ऐकून घेतल्यानंतर पालिका आयुक्तांना बोलावून घेतले. त्यानंतर अजितदादांनी या विद्यार्थ्यांचं मानधन १५ ते २० दिवसांत त्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेशच दिले. अजितदादांच्या या आदेशानंतर चक्रे फिरली आणि विद्यार्थ्यांच्या खात्यात मानधन जमा झाले. आपल्या खात्यात मानधन जमा होताच या विद्यार्थ्यांनी आज महाविद्यालयाच्या पायरीवर बसून हातात फलक घेऊन अजितदादांबद्दल आभार व्यक्त केला. ‘थँक्यू अजितदादा’, ‘थँक्यू राष्ट्रवादी विद्यार्थी’ आणि ‘अशक्य ते शक्य करून दाखवणारा नेता म्हणजे अजितदादा’, असे फलक घेऊन हे विद्यार्थी कॉलेजच्या पायरीवर बसले होते. त्यांच्या या अनोख्या आणि हटके आभाराने अनेकांचे लक्ष वेधून घेतले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER