अजितदादा एकतर तुम्ही मला चहाला बोलवा किंवा तुम्हीच आमच्याकडे या; फडणवीसांची थेट ऑफर

Ajit Pawar-Devendra Fadnavis

पुणे :  नववर्षाच्या पहिल्याच दिवशी  उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) हे एकाच व्यासपीठावर आले आहेत. एकेवेळी पहाटे सरकार स्थापन करणारे हे दोन नेते नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एकाच व्यासपीठावर आल्याने याची चर्चाही तशीच झाली. या कार्यक्रमात दोन्ही नेते काय बोलतात त्याकडे अनेकांनी कान टवकारून लक्ष ठेवले आहे. अशातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आता थेट व्यासपीठावरूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ऑफर करावी असे विधान केल्याने चर्चेचा विषय ठरला आहे.

‘अजितदादा तुम्ही मला एकतर चहाला बोलवा किंवा तुम्हीच आमच्याकडे या’ असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यांचे हे विधान चर्चेचा भाग बनला आहे. पुणे महापालिकेच्या भामा आसखेड प्रकल्पाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये पार पडले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शैलीत जोरदार टोलेबाजी केली. ‘पुणेकरांना या कार्यक्रमाची जेवढी उत्कंठा नव्हती, तेवढी मीडियाला होती. दोन दिवसांपासून अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर येणार म्हणून बातम्याच बातम्या ऐकायला मिळाल्या.

आता मी आणि दादा एकत्र येणार असलो की दोन दिवस बातम्या चालतात.  आता आम्ही काय कुस्ती करणार की गाणे म्हणणार होतो? त्यामुळे अजितदादांनी एकतर माझ्याकडे चहाला यावे किंवा मला तुमच्याकडे बोलवावे, मीडियाला बातम्याच बातम्या मिळतील, असा टोला फडणवीस यांनी लगावला. ‘पुणे महापालिकेच्या भामा आसखेड प्रकल्पाची पुणेकरांना नववर्षाच्या दिवशी ही भेट मिळाली आहे. या प्रकल्पाच्या प्रश्नासाठी गिरीश बापट यांनी वेळोवेळी बैठका घेतल्या होत्या. पालिकेकडूनही चांगली योजना निर्माण झाली आहे.

यापुढे पुण्याच्या प्रश्नासाठी काही अडचण जरी आली तरी तिजोरीच्या चाव्या यात अजित पवार यांच्याकडेच आहे. त्यामुळे कुठे कमी पडणार नाही.’ असा टोलाही फडणवीस यांनी लगावला. दरम्यान, महापालिकेच्या सभागृहात अजित पवार जात असताना भाजप युवा मोर्च्याच्या  कार्यकर्त्यांनी पुणे शहराची ‘ताकद गिरीश बापट’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ‘दादा दादा’ घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. एकच नारा जय श्रीराम श्रीराम अशा घोषणाही भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. त्याला उत्तर म्हणून एकच वादा अजित दादा दादा, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. दोन्ही बाजूने कार्यकर्ते  जोरदार घोषणाबाजी देत असल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER