अजित पवारांचा पुणे मेट्रोचे नाव बदलण्यापासून ते अनेक कामांचा धडाका

Ajit Pawar

पुणे : पुण्यातील मेट्रोचे प्रस्तावित 6 कॉरिडोर टप्प्याटप्प्याने सुरु करण्याऐवजी सगळ्या कॉरिडोरचे काम एकाचवेळी सुरु करण्यासाठी डीपीआर करण्याचे आदेश देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेट्रोसंदर्भातील अनेक महत्वाचे निर्णय घेतले. पदभार स्विकारल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यानी बैठका आणि निर्णयांचा धडाकाच लावला. पुण्यात आज त्यांनी विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली.

त्याचबरोबर पिंपरी स्वारगेट मेट्रोमार्ग वाढवून निगडी कात्रज असा करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. तसेच पुणे मेट्रोचे नाव बदलून ‘पुणे-पिंपरी चिंचवड महामेट्रो’ असे करण्याच्या सूचनासुद्धा त्यांनी प्रशासनाला दिल्यात. वनाज रामवाडी मार्ग वाढवून तो चांदणी चौक ते वाघोली असा होणार आहे. शिवाजीनगर हिंजवडी हा पीएमआरडीए करत असलेला मेट्रो चा मार्ग शिवाजीनगर माण असा वाढवण्यात येणार आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे येत्या दोन वर्षांत देखणे, दिमाखदार स्मारक : मंत्रिमंडळाचा निर्णय-अजित पवार

निगडी चाकण मेट्रो मार्गाची चाचपणी करण्याचे आदेश देण्यात आलेत. हडपसर स्वारगेट हा मार्ग नव्याने प्रस्तावित आहे. तर खडकवासला ते स्वारगेट हा मेट्रो मार्गही प्रस्तावित आहे. वारजे ते शिवाजीनगर ह्या मार्गाचा विचार करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात.

त्याचप्रमाणे वाडीया रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लावणे, ईस्टर्न फ्री वेला माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव देणे आणि राज्यातील गुन्हेगारी संपवण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे आदेश देत अजित पवार यांनी प्रशासनावर असलेला आपला वचक दाखवून दिले.

वाडीया रुग्णालयाबद्दल आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलवली होती. पण त्या आधीच अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मीला ठाकरे यांच्यासोबत बैठक घेत रुग्णालयासाठी ४६ कोटी रुपये देण्यात येणार आहेत असे सांगत प्रश्न मार्गी लावला आणि एक प्रकारे उद्धव ठाकरे यांच्यावर मात केली.