नागपुरातील राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या आभा पांडेंना विधानसभेत पाठवण्याचा अजितदादांचा शब्द?

Abha Pandey & Ajit Pawar

नागपूर : आज नागपुरात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत अपक्ष असलेल्या जेष्ठ नगरसेविका आभा पांडे (Abha Pandey) यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यासह राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी आपल्या भाषणात अजित पवार यांनी आभा पांडे यांची गरज विधानसभेत असल्याचे म्हणत विधानसभेत पाठवण्याचा शब्द दिला.

यावेळी अजित पवार म्हणाले की, आभा ताई तुमचं भाषण ऐकून मला वाटतं, तुमची गरज महापालिकेत नाही तर विधानसभेत आहे. यावेळी अजित पवार यांनी आभा पांडे यांची विधानसभेला गरज असण्याबाबतचं वक्तव्य केल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे. अपक्ष नगरसेविका आभा पांडे यांना पक्ष प्रवेश करताना पालिकेतून थेट विधानसभा तिकीटाचं आश्वासन दिलंय की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आभा पांडे आज पक्षात प्रवेश करत आहेत, त्याचा मोठा आनंद आहे. आतापर्यंत अपक्ष असताना सुद्दा त्यांच्या मागे मोठा जनसमुदाय आहे, ते या सभेच्या गर्दीवरून दिसून येते. गुंड प्रवृत्तीच्या लोकांना भाजपच्या काळात महामंडळ दिली. माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही आता राष्ट्रवादी ला साथ द्या आता तुमच्याकडे नेते आहेत. भाजपच्या काही मंडळींना सुद्धा वाटते परिवर्तन व्हावं. भाजपचे काही लोक आपल्या पक्षात येण्यास तयार आहेत, असा दावा पवार यांनी केला.

नागपुरात गुंडगिरी वाढली होती. भाजपच्या या महापालिकेत भ्रष्टाचार होत आहे. इथे संडास सुद्धा कागदावरून गायब होतात. उपराजधानीचं शहर आहे, हे स्वच्छ शहर असलं पाहिजे. केंद्रापासून राज्यात सुद्धा भाजपच्या काळात मोठी मंत्रालय होते. त्यांनी शहरासाठी काय केलं? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ज्या महापालिकेने कमी वयाचा महापौर म्हणून सन्मान दिला, त्यांनी या राज्यात असताना या महापालिकेचे प्रश्न सोडवले का? महापालिकेतील भ्रष्टाचार झालेला असेल तर पुरावे मला द्या मी चौकशी लावतो. जे मला करता येत नाही तो शब्द मी देत नाही, असं अजित पवार म्हणाले.

विदर्भात आम्ही माणसं जोडण्याचं काम करत आहोत. आम्ही अधिवेशननंतर आणखी दौरे करू. पदवीधरमध्ये शिकल्या सवरल्या लोकांनी भाजपला नाकारलं. शेतकऱ्यांसाठी काही करण्यापेक्षा त्यांच्या रस्त्यात खिळे ठोकले जातात. केंद्र सरकार त्यांच्यासोबत चर्चा सुद्धा करायला तयार नाही. पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहे. हे सरकार नेमकं कोणासाठी काम करतंय? गरिबांसाठी की श्रीमंतासाठी?, असा सवाल त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER