‘तुम कुस्ती करो, हम कपडे संभालते हैं!’ असले काही करू नका; अजितदादांचा सल्ला

मुंबई :- राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक मोलाचा सल्ला दिला. तर पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांवर चांगलाच हल्लाबोल केला. विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार पहिल्यांदाच इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर होते. तेव्हा अजितदादा यांच्या हस्ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आणि आपल्या कार्यकर्त्यांना एक मोलाचा सल्लाही दिला.

“काही जण तिकडं पळाली. त्यांचा पायगुण असा की त्यांची सत्ताच गेली आणि आमची सत्ता आली. आता असली जित्राबं नकोच आपल्याला. ह्यांनी कितीही होय म्हणू द्या. मी नाहीच घ्यायचं म्हणतो. फक्त मला कुस्ती करायला लावून तुम्ही कपडे सांभाळू नका. नाही तर तुम्ही ‘तुम कुस्ती करो, हम कपडे संभालते हैं!’ असं नाही झालं पाहिजे.” असे म्हणत  अजित पवार यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकून गेलेल्या नेत्यांना खडेबोल सुनावले .

“आता आपल्याला नवी टीम तयार करायची आहे. मला पण ३० वर्षे राजकारणात झाली. त्यावेळी माझ्यासोबत तरुणांची टीम होती. आताही आपण तरुणांची टीम तयार करू. तुम्ही काही काळजी करू नका. फक्त निर्व्यसनी राहा. चांगली कामं करा. ह्या बोटाचा थुका त्या बोटाला लावू नका. टोप्या फिरवू नका. दिलेला शब्द पाळा आणि शब्दाचे पक्के राहा. पवारसाहेबांशी एकनिष्ठ राहा. आपण फार चांगल्या पद्धतीने काम करू.” अशा शब्दात अजित पवार यांनी तरुण कार्यकर्त्यांना मोलाचा सल्ला दिला.

ही बातमी पण वाचा : अजित पवारांच्या कार्यक्रमात कार्यकर्त्याची घोषणाबाजी , दादा म्हणाले … 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER