अजित पवारांची ‘पॉलिटिकल ऑफर’; भाजपकडून सतर्कता

पुणे: आगामी निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शुक्रवारी पुण्यात ‘इलेक्टिव्ह मेरिट’ (Elective Merit) असलेल्यांना वाजत पक्षात घेणार असल्याचे वक्तव्य केले. पवार यांच्या भूमिकेमुळे सत्ताधारी भाजप (BJP) सतर्क झाली आहे .

काही दिवसांपूर्वी १९ नगरसेवकांवर ‘वॉच’ ठेवत असल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यातच महापौर, स्थायी समिती अध्यक्ष यांसह महत्त्वाच्या पदांवरील पदाधिकारी न बदलण्याच्या पक्षाच्या निर्णयामुळे काही ज्येष्ठ नगरसेवक नाराज आहेत.

गेल्या काही दिवसांत भाजपातील ‘आयारामां’ना पुन्हा परतीचे वेध लागले आहेत. अजित पवार यांनी निवडून येण्याची क्षमता असलेल्यांना पक्षात घेण्याचे केलेले वक्तव्य पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाचे मानले जात आहे. ठराविक नगरसेवकांना संधी मिळत असल्याने नाराज नगरसेवकांना ‘गळाला’ लावण्याचे प्रयत्न विरोधी पक्षांकडून केले जातील.

स्थायी समितीच्या आठ सदस्यांची निवड लवकरच केली जाणार आहे. यावेळी अध्यक्ष कोण असणार याबद्दल सुरुवातीला असलेली उत्सुकता शमली आहे. कारण विद्यमान अध्यक्ष हेमंत रासने यांनाच मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे. सभागृह नेते बदलानंतर महापौर बदलाची चर्चा सुरु झाली होती. महापौरपदावर नवा चेहरा हवा, अशी मागणी काही नगरसेवकांनी केली होती. परंतु, महापौरही बदलणार नसल्याचे पक्षाकडून स्पष्ट केले.

पालिकेत सत्ताबदल झाल्यानंतर मुक्ता टिळक, मुरलीधर मोहोळ, सुनील कांबळे, योगेश मुळीक, हेमंत रासने, श्रीनाथ भिमाले, धीरज घाटे यांना प्रमुख पदांवर संधी मिळाली. नव्या चेहऱ्यांना संधी मिळणे गरजेचे असल्याचे मत काही नगरसेवक खासगीत व्यक्त करीत आहेत. यंदा काही उपनगरांसह सिंहगड रस्ता परिसराला प्रतिनिधित्व मिळेल अशी अटकळ बांधली जात होती. त्यादृष्टीने श्रीकांत जगताप, राजाभाऊ लायगुडे, शंकर पवार यांनी तयारी चालविली होती. सातारा रस्त्यावरील धनकवडीतील नगरसेविका वर्षा तापकीर, राजेंद्र शिळीमकर हे स्थायी समिती अध्यक्षपदाच्या ‘रेस’मध्ये होते. परंतु, त्यांचीही संधी हुकल्याचे बोलले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER