‘पिंपरी-चिंचवड’ बालेकिल्ल्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी अजित पवारांची नवी रणनीती?

ajit-pawars-new-strategy-for pimpri-chinchwad

मुंबई : राष्ट्रवादीचा (NCP) बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवडवर (pimpri-chinchwad) वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. अजित पवारांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपने घवघवीत यश मिळवत सत्ता स्थापन केली तर राष्ट्रवादीला दुसऱ्या स्थानावर समाधान मानत विरोधी पक्षात बसावे लागले.

याचे गांभीर्य लक्षात घेता २०२२ मध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुका येत असून उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा कारभार स्वीकारल्यानंतर पक्ष बळकटीला त्यांनी नव्याने उभारी देण्यास सुरुवात केली आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना शह देण्यासाठी त्यांचे खास मित्र असलेल्या राजू मिसाळ यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. खुद्द अजित पवार व पार्थ पवार यांनी मिसाळ यांच्या नावाची शिफारस केल्याचे समजते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांवेळी मावळमधून पार्थ पवार यांना तिकीट मिळाल्यानंतर राजू मिसाळ यांनी मोलाचा वाटा निभावला होता.

दरम्यान, या विरोधी पक्षनेतेपदासाठी नगरसेवक अजित गव्हाणे यांचेदेखील नाव पुढे होते; मात्र विधानसभा निवडणुकीवेळी झालेल्या घडामोडी मिसाळ यांच्या गटाने निदर्शनास आणत हा मुद्दा उचलून धरल्याने त्यांचे नाव पीछाडीवर पडले. तर, येत्या काळात महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचीदेखील बदली होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व हर्डीकर यांची जवळीकता असल्याचे बोलले जाते. त्यामुळेच २०२२ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकी डोळ्यांसमोर ठेवून उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच हर्डीकर यांचीदेखील बदली करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER