अजित पवारांचं मिशन पिंपरी-चिंचवड; केला भाजपच्या दोन आमदारांचा करेक्ट कार्यक्रम

Maharashtra Today

पिंपरी :- पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) महापालिकेच्या निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असताना सत्ताधारी भाजपची कोंडी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) मिशन मोडवर आले आहेत. महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आणि मतदार संघातील आमदारांची कोंडी करण्यासाठी अजित पवार यांनी मोठा डाव आखला आहे. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे विलीनीकरण पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात करण्याचा निर्णय अजित पवार यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे सत्ताधारी पिंपरी-चिंचवड महपालिका (Pimpri-Chinchwad Municipal Corporation) व शहरातील भारतीय जनता पक्षाचे दोन्ही आमदार महेश लांडगे (भोसरी) व लक्ष्मण जगताप (चिंचवड) यांची कोंडी होणार आहे. त्यामुळे या तिघा जुन्या, नव्या कारभाऱ्यांत आता खरा संघर्ष सुरु झाला आहे. त्याचे चित्र या दोन्ही आमदारांनी दिलेल्या संतप्त प्रतिक्रियेतून दिसून आले.

या निर्णयामुळे भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिका व तिचे सध्याचे वरील दोन्ही कारभारी आमदारांची कोंडी करण्याचा प्रयत्न अजित पवारांनी केला आहे. त्यामुळे शहराच्या विकासाला खीळ बसणार असून विकास प्रकल्प रेंगाळणार असल्याची भीती या आमदारांनी व्यक्त केली आहे. तसेच, शहराला आता बकालपणा येण्याची शक्यता असल्याने त्यावरून त्यांनी संताप व्यक्त केल. पिंपरी महापालिका निवडणूक अवघ्या नऊ महिन्यांवर आली असताना हा निर्णय झाल्याने पालिकेतील सत्ताधारी भाजप व त्यांचे पदाधिकारी चवताळले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहराचा विकास थांबणार नसला, तरी त्याला काहीअंशी खीळ बसणार असल्याने हा निर्णय जाहीर होतो न होतो तोच आमदार लांडगेंनी संतप्त प्रतिक्रिया देत राज्य सरकार व त्यातून हा निर्णय ज्यांच्यामुळे सरकारने घेतला ते अजित पवार यांच्याविरुद्ध अप्रत्यक्षपणे रणशिंगच फुंकले. सोन्याचे अंडे देणारी प्राधिकरणासारखी कोंबडी हातातून निसटणार असल्याने आशिया खंडात श्रीमंत पालिका अशी असलेली ओळख आता राहिल की नाही, ही चिंता आता या दोन्ही आमदारांना सतावत आहे. त्यामुळे प्राधिकरण पालिकेत वर्ग करण्याची मागणी पालिका पदाधिकारी आणि दोन्ही आमदारांनी केली आहे. एकूणच या एका निर्णयाने अजित पवार यांच्याविरुद्ध महेश लांडगे व लक्ष्मण जगताप आणि जोडीला पालिका पदाधिकारी असा सामना आता रंगला आहे.

ही बातमी पण वाचा : अजित पवारांची आज आढावा बैठक; कडक लॉकडाऊनवर निर्णय होण्याची शक्यता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button