अजित पवारांचे अत्यंत विश्वासू संग्राम कोतेंना पक्षात मोठी जबाबदारी मिळणार?

Ajit PawarS loyal Sangram Kote.jpg

अहमदनगर : मणक्याचा आजारामुळे संग्राम कोते (Sangram Kote) यांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी संग्राम कोते यांची दूरध्वनीद्वारे तब्येतीची विचारपूस केली होती. तसेच लवकर बरे होऊन महाराष्ट्रात मोठे काम करायचे आहे, असे सांगितले होते. त्यानुसार कोते यांनी नुकतीच पवार यांची भेट घेतली. या वेळी विविध विषयांवर चर्चा झाली. अजितदादांनी पुन्हा सक्रीय होण्याचे आदेश दिले, असल्याचे कोते यांनी सरकारनामा या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. तसेच लवकरच पक्षातर्फे मोठी जबाबदारी मिळण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना कोते यांना राज्यभर फिरावे लागत होते. त्यामुळे त्यांना मणक्यांचा त्रास होऊ लागला. मणकेदुखीमुळे पक्षाने दिलेल्या पदाला न्याय देता येणार नाही, असे लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतः फेब्रुवारी २०१९ मध्ये राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. कोते यांचे काम अजित पवार यांच्या चांगले स्मरणात राहिले. त्यांनी जुलैमध्ये कोते यांना फोन करून विचारपूस केली व बरे वाटल्यानंतर भेटण्यासाठी बोलावले. नुकतीच भेट होऊन त्यांना कामाला लागण्याचे आदेश पवार यांनी दिले.

दरम्यान, संग्राम कोते यांचा विद्यार्थी व तरुणांमध्ये मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेस कोते यांच्याकडे कुठली जबाबदारी देतात, राज्याचे कोणते पद त्यांना देण्यात येईल, याकडे अहमदनगर जिल्ह्यातील युवा कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे. मोर्चाच्या निमित्ताने हे सर्व कार्यकर्ते कोते यांच्या अधिक जवळ आहेत. त्यामुळे लवकरच पक्षाचे मोठे पद नगर जिल्ह्याकडे येण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER